

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा: नेकनूरचे नव्याने उभारलेले बसस्थानक सुरू करण्यास मोठा विलंब होत असल्याने प्रवाशांना रस्त्यावर उन्हात उभे राहून चढ उतार करावी लागत होती. याकडे दैनिक पुढारीने लक्ष वेधून प्रवाशांचे हाल मांडले. अखेर रविवारचा मुहूर्त गाठून एसटी महामंडळाने बसची चाके स्थानकात वळवत प्रवाशांना दिलासा दिला आहे.
दीड वर्ष लोटले असताना नेकनूरच्या बसस्थानकाचे काम रेंगाळत ठेवून गुत्तेदाराने प्रवाशांना वेठीस धरले. यामुळे तासनतास उन्हात रस्त्यावर उभे राहून प्रवाशांना चढ उतार करण्याची वेळ आली यामुळे विशेषतः वृध्द, महिला, लहान मुलांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले.
याकडे दैनिक पुढारीने लक्ष वेधून 'नेकनूर बसस्थानक बनले शोभेची वास्तू' आणि नेकनूरमध्ये प्रवाशांना उन्हात बसण्याची वेळ या मथळ्याखाली वृत्त दिले प्रवाशांना उन्हात थांबण्यासोबत स्वच्छता गृहाआभावी महिलांची होत असलेली कुचंबणा रस्त्यावर होत असलेला वाहतूकीचा आढथळा यावर प्रकाश टाकत संबधीत विभागाला लक्ष वेधण्यास भाग पाडले.
दिवाळीच्या सुट्या असल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात रेलचेल असून रविवारी बाजार असल्याने अखेर एसटी बस स्थानकात वळवत प्रवाशांना दिलासा देण्याचे काम महामंडळाने केले. बसस्थानकात निवारा उपलब्ध झाल्याने प्रवाशांची उन्हापासून सुटका झाली आहे.