

Ashti cash and gold stolen
कडा : सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानाच्या घरातच दिवसाढवळ्या चोरी झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील कापशी येथील जवान महादेव गोल्हार यांच्या घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून एक लाख रुपये लंपास केली.
घरातील सर्व कुटुंबीय शेतावर कामासाठी गेले असताना, चोरट्यांनी संधी साधत घराचे कुलूप तोडले आणि बेधडकपणे घरात प्रवेश केला. जवान सीमेवर देशासाठी लढत असताना,त्यांच्या कुटुंबावर असा आघात होणे अत्यंत संतापजनक व खेदजनक आहे. देशाच्या सुरक्षेसाठी प्राणपणाने उभे राहणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कुणाची? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. गावागावातील चोरीच्या घटना वाढत असताना, पोलिस यंत्रणा नेमकी काय करत आहे,असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली असून तपास सुरू आहे.मात्र,चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कडक कारवाई झाली नाही,तर नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.