

BLO assaulted by corporator's husband in Beed city; case registered.
बीड, पुढारी वृत्तसेवा : मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत बीएलओ म्हणून काम करणाऱ्या एका शिक्षकाला मतदान नोंदणीचा फॉर्म भरून देण्याच्या वादातून मारहाण झाल्याची घटना बीड शहरात घडली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात नगरसेविकेच्या पतीविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादी नुसार, जयदत्त जगन्नाथ सुद्रुक (४९) हे कॅनल रोडवरील यशवंत माध्यमिक विद्यालयात सहाय्यक शिक्षक असून ऑगस्ट २०२४ पासून त्यांची बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. १५ जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ते सावरकर विद्यालय परिसरात मतदार नोंदणीची कामे करत असताना सागर देशपांडे नावाचा व्यक्ती तेथे आला.
त्याने एका नागरिकाचा नोंदणी फॉर्म तात्काळ भरून देण्याची मागणी केली. संबंधित मतदाराचा आवश्यक पुरावा उपलब्ध नसल्याने दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयातून पुरावा आणल्यानंतर फॉर्म भरता येईल, असे शिक्षकांनी सांगितल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. यावरून संतप्त झालेल्या सागर देशपांडे यांनी शिवीगाळ करत शिक्षकांचा गळा दाबला, तोंडावर दोन चापटा मारल्या तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपस्थित नागरिकांनी मध्यस्थी करून वाद मिटविला. यानंतर जखमी शिक्षकांनी बीड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
फिर्यादीनुसार, आरोपी सागर देशपांडे हे बीड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधील नगरसेविका भाग्यश्री देशपांडे यांचे पती आहेत. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.