

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : माजलगाव शहरातील स्वामी समर्थ मंदिराच्या पाठीमागील रस्त्यावर भाजपचे तालुका सरचिटणीस, बीड लोकसभा मतदारसंघाचे विस्तारक बाबासाहेब प्रभाकर आगे (वय ३०) यांचा आज (दि.१५) नारायण शंकर फपाळ (वय ३५, रा. बेलूरा ) याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून भरदुपारी दोनच्या सुमारास तलवारी सारख्या धारदार शस्त्राने सपासप वार करत खून केला. घटनेनंतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्वामी समर्थ मंदिरा पाठीमागील रस्त्यावर असलेल्या भाजप कार्यालयासमोर आज दुपारी बाबासाहेब आगे उभे होते. यावेळी नारायण फपाळ यांने आगे याच्यावर तलवारी सारख्या धारदार शस्त्राने सपासप वार केले. यानंतर आगे रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळले. या घटनेनंतर नारायण स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. आपल्या पत्नीशी बाबासाहेब याचे अनैतिक संबंध होते. त्यास सांगूनही तो ऐकत नसल्याने आपण त्याची हत्या केल्याची कबुली नारायण यांने पोलिसांत दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ करत आहेत.
नारायण बाबासाहेब याच्यावर वार करताना कुणाही पुढे आले नाही. तेवढ्यात एका तरुणाने हल्लेखोर नारायणवर दगडफेक करून बाबासाहेब यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुणी समोर आले, तर त्याचेही हाल करू, असे नारायण मोठ्याने ओरडत सांगत होता. त्यामुळे परिसरातील कोणीच बाबासाहेब यांना वाचविण्यासाठी पुढे आले नाहीत. तर काहीजण व्हिडिओ काढण्यात मग्न होते.
भाजप पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या व लोकसभा मतदारसंघात विस्तारक म्हणून कार्य करणाऱ्या बाबा आगे यांची दखल भाजपने घेतली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी देशातील भाजपच्या विस्तारकांना खास विमान प्रवासासह निमंत्रण दिले होते. बाबासाहेब शपथविधीसाठी दिल्लीला गेले होते.