

बीड पुढारी वृत्तसेवा: पाच लाख रुपयांसाठी एका नववर्षीय बालकाचे बीड शहरातील पांगरी रोड भागातून अपहरण केल्याची घटना पाच वाजता घडली होती. याची माहिती पोलिसांना मिळतात अवघ्या दीड तासात या अपहरणकर्त्याला जेरबंद करत मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. या आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत त्यांनी दिली.
जगदीश गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. गायकवाड याने पांगरी रोड भागातील एका हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या नववर्षीय बालकाचे कुरकुरे देण्याचे आमिष दाखवून अपहरण केले होते. यानंतर त्याने मुलाच्या आई-वडिलांना फोन करत पाच लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली. पालकांनी याबाबत बीड पोलिसांशी संपर्क करत तक्रार नोंदवली. यानंतर स्थानिक गुन्हे शाखा शिवाजीनगर पोलीस यांच्या टीम कामाला लागल्या आणि अवघ्या दीड तासात आरोपीला जेरबंद करण्यात आले.
या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगदीश गायकवाड यांच्यावर यापूर्वी खंडणी लूटमार असे गुन्हे दाखल असून आता अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याने त्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान स्वतः पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी या सगळ्या प्रकरणात लक्ष देत या बालकाची सुटका करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच कामगिरी करणाऱ्या टीमचे अभिनंदन केले. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे मुन्ना वाघ, दुबाले, शिवाजीनगर चे विलास मोरे, रवींद्र आघाव, अभिजीत सानप याबरोबरच सायबर पोलीस चे विकी सुरवसे व इतरांनी कारवाई केली.