

धारूर : केज राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्याजवळ टँकरचे चाक दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याला गंभीर जखमी अवस्थेत अंबाजोगाई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असताना उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अंगद लांडगे (२७, रा. पिसेगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.
एका दुकानामध्ये मॅनेजरचे काम करणारे अंगद लांडगे दुकानाच्या उधारी वसुलीच्या कामासाठी धारूर येथे आले होते. परत जात असताना राष्ट्रीय मार्गावर टोल नाक्याजवळ अज्ञात कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार खाली पडल्यानंतर टँकरचे चाक अंगावरून गेल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला अंबाजोगाई येथील रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या तरुणाचे आठ दिवसापूर्वी लग्न झाले होते. संबंधित टँकर धारूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पुढील कारवाई पोलीस करत आहेत.