

नेकनूर (बीड) : विकासाच्या नावाखाली निसर्गाचा बळी देण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना, कायद्याचे रक्षकच जर बघ्याची भूमिका घेत असतील तर सामान्य नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न नेकनूर परिसरात उपस्थित झाला आहे.
गारपीर माथा ते चाकरवाडी या रस्त्यावर एका खासगी पवनचक्की कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आली आहे. या प्रकाराबाबत नेकनूर पोलीस स्टेशन येथे वैभव शिंदे यांनी दोन वेळा लेखी निवेदन देऊन पंधरा दिवस उलटले, तरीही अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गारपीर माथा ते चाकरवाडी रस्त्यावर संबंधित खासगी पवनचक्की कंपनीने आपल्या प्रकल्पाच्या कामासाठी कंपनीच्या कंत्राटदारांनी रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे कोणतीही अधिकृत शासकीय परवानगी न घेता तोडून टाकली आहेत. 'महाराष्ट्र वृक्ष तोड (नियमन) अधिनियमा'नुसार, कोणतेही वृक्ष तोडण्यापूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, संबंधित कंपनीने सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आले.
या बेकायदेशीर वृक्षतोडीबाबत नेकनूर पोलीस स्टेशन येथे दोन वेळा लेखी निवेदने देऊन देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे. तक्रार देऊन पंधरा दिवस झाले तरी अद्याप साधा गुन्हाही दाखल झालेला नाही, ना कुठली चौकशी सुरू झाली आहे. नेकनूर पोलीस प्रशासनाने तत्काळ या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित पवनचक्की कंपनीचे अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वैभव शिंदे आणि नागरिकांनी दिला आहे.