Beed tiger rescue | बीड जिल्ह्यात १०० वर्षांनंतर आढळलेल्या वाघाला 'रेस्क्यू' करणार!

प्रस्तावाच्या हालचाली सुरू; बेलखंडी पाटोद्याजवळ आढळले पावलाचे ठसे
Beed tiger rescue
Beed tiger rescue
Published on: 
Updated on: 

उदय नागरगोजे

बीड : बीड जिल्ह्यात जवळपास शंभर वर्षांनंतर वाघ आढळून आल्याने याची वन्यप्रेमींकडून सकारात्मक चर्चा होत होती. परंतु या वाघाच्या हल्ल्यात देवळालीजवळ एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर वनविभागाकडून आता या वाघाच्या रेस्क्यु संदर्भात हालचाली सुरू झाल्यात. यासाठी समिती गठीत करून त्यांचे मत घेऊन प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मंजुरी मिळताच वाघाचे लोकेशन घेत रेस्क्यू ऑपरेशन केले जाणार असल्याची माहिती आष्टीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली.

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र आहे. परंतु गेल्या अनेक वर्षांत वाघ मात्र आढळला नव्हता. जवळपास शंभर वर्षांनंतर काही महिन्यांपूर्वी वाघ दिसून आल्याने याची चर्चा होत होती. सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड आणि अहिल्यानगर अशा पाच जिल्ह्यांत भ्रमंती करणारा हा वाघ टिपेश्वरच्या जंगलातून आल्याची माहिती देखील समोर आली होती. वाघाने आष्टी, पाटोदा तालुक्यात वन्य व पाळीव प्राण्यांची शिकार केल्याचे तसेच ट्रॅप कॅमेरात त्याचे छायाचित्र देखील समोर आले होते. यामुळे वनविभागाकडून त्या त्या भागातील शेतकरी, ग्रामस्थांना सूचना केल्या जात होत्या.

या दरम्यानच आष्टी तालुक्यातील देवळाली परिसरात गवत कापण्यासाठी जंगलालगत गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करत त्याला ठार केल्याची घटना घडली होती. यानंतर मात्र शेतकरी, ग्रामस्थांमधून असुरक्षिततेची भावना पसरली होती. वनविभागाकडून या वाघाचे लोकेशन काढण्याचा प्रयत्न केला जात असला तरी रात्रीतून चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटरचा पल्ला हा वाघ गाठत असल्याने शोधमोहिमेलाही मर्यादा येत आहेत. अशातच आता या वाघाच्या रेस्क्युची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मानवी जीवाला पुन्हा धोका निर्माण होऊ नये याकरिता असा प्रस्ताव पाठवला जाणार असून यासाठी वनविभागातील अधिकारी, कर्मचारी, स्थानिक सरपंच यांचे अभिप्राय घेतले जाणार आहेत. दरम्यान, मंगळवारी सकाळी वाघाच्या पावलाचे ठसे बेलखंडी पाटोदा या बीड तालुक्यातील गाव शिवारात आढळले असून तो करचुंडी, लिंबागणेश मार्गे धाराशिव जिल्ह्यात जाऊ शकतो, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली.

वाघाला रेस्क्यूमधून निसटण्याचा अनुभव!

रामलिंग नावाने ओळखला जाणारा हा वाघ रेस्क्यूमधून यापूर्वी निसटला होता. 10 जानेवारी ते 5 एप्रिल 2025 या दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन धाराशिव जिल्ह्यात राबवण्यात आले होते. त्यावेळी 9 आणि 26 फे ब्रुवारी रोजी दोन वेळा त्याला डार्ट मारण्यात आला होता, परंतु तो बेशुद्ध झाला नाही. तो अनुभव त्याला असल्याने आता पुन्हा त्याला रेस्क्यू करणे आव्हानात्मक असल्याचे अमोल मुंडे यांनी सांगितले.

Beed tiger rescue
Illegal Liquor : बीड शहर परिसरात अवैध दारुचा महापूर !

सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये सोडणार!

रामलिंग नावाने ओळखल्या जाणाऱ्या वाघाला यापूर्वी धाराशिवमधून रेस्क्यू केले जाणार होते. त्याला पकडल्यानंतर रेडीओ कॉलर लावली जाणार होती. त्यासाठीची रेडीओ कॉलर जर्मनीवरून मागवण्यात आलेली होती. ती अद्यापही तशीच आहे. तीच रेडिओ कॉलर आता वापरली जाईल. त्यावेळी वाघाला सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये सोडले जाणार होते, त्याच आदेशाचे नूतनीकरण आता देखील होण्याची शक्यता आहे.

काय असते रेस्क्यू ऑपरेशन?

रेस्क्यू ऑपरेशनमध्ये वाघाने एखाद्या ठिकाणी शिकार केल्यानंतर त्याच परिसरात सापळा लावला जातो. पिंजरा लावून वाघाची प्रतीक्षा केली जाते. वाघ त्या परिसरात येताच रेस्क्यू टिमकडून त्याला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला जातो. या डार्टमुळे वाघ अर्धा तास बेशुद्ध होतो, तेव्हढ्या वेळात त्याला पिंजऱ्यात टाकणे गरजेचे असते, ही वेळ साधण्यासाठी मोठ कसरत बीड आणि धाराशिव जिल्ह्यात करावी लागणार आहे. कारण हा भाग डोंगराळ आहे, वाघ जर एखाद्या दरी-कपारीत जाऊन बसला तर त्याला शुद्धीवर येण्यापूर्वी पिंजऱ्यात टाकण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतील. यामुळे हे रेस्क्यू ऑपरेशन आव्हानात्मक ठरणार आहे.

Beed tiger rescue
Beed News : शेख कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी बीड शहरात विराट मोर्चा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.