Beed Crime : वडवणी तालुक्यात तरुणाचा मृतदेह आढळला

नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.
Beed Crime News
निवास राठोडpudhari photo
Published on
Updated on

वडवणी : वडवणी तालुक्यातील पुसरा शिवारात चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा संशयास्पद अवस्थेतील मृतदेह आढळून आला. निवास राठोड (३५) असे या तरुणाचे नाव असून या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

तिगांव ग्रामपंचायत हद्दीतील गांडगे वस्ती येथील रहिवासी निवास गोविंद राठोड (वय ३५) हे आयुर्वेदिक औषध विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शांत, मनमिळावू स्वभावामुळे ते गावात परिचित होते. गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले; मात्र रात्रीपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. कुटुंबीयांनी स्वतःच्या पातळीवर शोध घेतला. मोबाईलवर संपर्क साधण्याचे अनेक प्रयत्न निष्फळ ठरले.

Beed Crime News
Crime News |अर्धवट जळालेला मृतदेह, हातावरील टॅटू अन् QR कोड...पतीच्या निर्घृण हत्‍येचे गूढ अखेर उलगडले!

नातेवाईक, मित्रमंडळी आणि गावकऱ्यांनी परिसरातील गावांमध्ये, ओळखीच्या ठिकाणी तसेच रुग्णालयांमध्ये चौकशी केली; मात्र काहीही धागेदोरे मिळाले नाहीत. अखेर पत्नी संगीता राठोड यांनी २५ एप्रिल रोजी वडवणी पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

मोबाईल लोकेशन, संपर्कातील व्यक्ती यांचा तपास सुरू असतानाच रविवारी (दि. २६ एप्रिल) दुपारी सुमारे ४ वाजता पुसरा शिवारातील एका शेतात तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाची ओळख निवास राठोड अशी पटली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व पुरावे जप्त केले असून मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला.

Beed Crime News
झाडाला लटकलेल्या अवस्थेत अनोळखी महिला-पुरुषाचे कुजलेले मृतदेह सापडले

येथे पाच डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. नातेवाईकांनी या प्रकरणात घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. मृतदेह सापडलेले ठिकाण, जवळील रिकामी बाटली आणि अचानक तुटलेला संपर्क या बाबी संशयास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. निष्पक्ष व सखोल तपासाची मागणी त्यांनी केली आहे.

शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येणार

या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून सहायक पोलिस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विष्णू जायभाय, तसेच पोलिस कर्मचारी आमेर सय्यद आणि हनुमंत कप्पे यांचे पथक तपास करत आहे. कॉल डिटेल्स, तांत्रिक माहिती आणि इतर बाबींचा सखोल छडा लावला जात आहे. मयत निवास राठोड यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व आई-वडील असा परिवार आहे. कुटुंबाचा कर्ता हरपल्याने त्यांच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे गूढ उलगडण्याची शक्यता असून संपूर्ण वडवणी तालुक्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news