

बीड जिल्ह्यातील विडा गावात धुळवडीच्या दिवशी घरजावयाची गाढवावरून वरात काढण्याची जुनी परंपरा आहे. यंदा या ‘गर्दभ स्वारी’चे मानकरी ठरले आहेत शिवाजी गालफाडे. गावातील तरुणांनी अचानक रचलेल्या सापळ्यात ते अडकले असून आता त्यांच्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
केज तालुक्यातील डोणगाव येथील मूळ रहिवासी असलेले शिवाजी गालफाडे हे विडा गावातील बाबुराव दुनघव यांचे जावई आहेत. लग्नानंतर ते सासरवाडी विडा येथेच स्थायिक झाले. त्यांनी तेथे घर बांधून रोजंदारी करून आपला चरितार्थ सुरू ठेवला. मात्र गावातील या परंपरेची ‘वेळ’ त्यांच्या वाट्याला येईल, अशी त्यांना कल्पनाही नव्हती.
धुळवडीच्या दिवशी सकाळी ते निवांत घरी असताना गावातील उत्साही तरुणांच्या टोळक्याने त्यांच्या घराकडे मोर्चा वळवला. भल्या पहाटेच त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि गाढवावरून मिरवणूक काढण्याची तयारी सुरू झाली.
विडा गावात घरजावई असलेल्या व्यक्तीची अशा पद्धतीने गाढवावरून वरात काढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. या प्रथेकडे गावकरी विनोद आणि पारंपरिक उत्सव म्हणून पाहतात.
सध्या गाढव सजवण्यात आले असून ढोल-ताशा वाद्यवृंदही सज्ज आहेत. शिवाजी गालफाडे यांना नखशिखांत रंगाने न्हाऊ घालून, रंगांची उधळण करत, गळ्यात जुन्या चप्पल-बुटांचा हार घालून गावातून मिरवणूक काढली जाणार आहे.
गावातील नागरिक आणि तरुण या अनोख्या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत आहेत धुळवडीच्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा हा कार्यक्रम गावात चर्चेचा विषय ठरला आहे.
मात्र या प्रथेवरून काहीजण सामाजिक दृष्टीकोनातूनही चर्चा करत आहेत. परंपरा, विनोद आणि सामाजिक संदेश यांचा संगम असलेली ही गर्दभ स्वारी यंदाही गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.