

Sugarcane Worker Death Mystery Kaij
गौतम बचुटे
केज : सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या परिसरात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या केज तालुक्यातील मुंडेवाडी येथील ऊसतोड मजूर बाबासाहेब गोपीनाथ तोगे यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम आहे. ऊसतोडणीच्या उचलीच्या पैशांवरून मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी तोगे यांना मारहाण करून त्यांची दुचाकी व मोबाईल जबरदस्तीने नेल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी मुलगा सचिन तोगे यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास बाबासाहेब तोगे हे घरामागील शेतात असताना अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार आणि राधाबाई अशोक केदार (सर्व रा. सांगवी, ता. केज) यांनी ऊसतोडणीच्या पैशांवरून त्यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे. या तिघांनी शिवीगाळ करून तोगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी त्यांचा मुलगा सचिन याने मध्यस्थी करून भांडण सोडवले. मारहाणीचे कारण विचारले असता, बाबासाहेब तोगे यांनी ऊसतोडणीसाठी ५० हजार रुपयांची उचल घेतली असून, ते पैसे परत करत नाहीत आणि कामावरही येत नसल्याचे सांगण्यात आल्याचा तक्रारीत उल्लेख आहे.
त्यानंतर संबंधितांनी बाबासाहेब तोगे यांची टीव्हीएस कंपनीची रायडर मोटारसायकल जबरदस्तीने नेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मोबाईलही घेऊन गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.
दरम्यान, १३ नोव्हेंबर रोजी सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना बाबासाहेब तोगे यांचा मृत्यू झाला. ऊसतोडणीच्या उचलीच्या पैशांवरून झालेल्या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. या प्रकरणी सांगली पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
१४ नोव्हेंबर रोजी मयताचा मुलगा सचिन बाबासाहेब तोगे याने दिलेल्या तक्रारीवरून अशोक काशीनाथ केदार, नानाभाऊ काशीनाथ केदार आणि राधाबाई अशोक केदार यांच्याविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाबासाहेब तोगे यांच्या मृतदेहाचे सांगली येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तोगे यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
सांगली पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. शवविच्छेदन आणि व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानुसार मारहाणीचा आरोप असलेल्या व्यक्तींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
बाबासाहेब तोगे यांना मारहाण करून त्यांची मोटारसायकल आणि मोबाईल नेल्याचा आरोप असलेल्या व्यक्ती व त्यांच्या साथीदारांविरुद्ध यापूर्वीही केज पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. नितीन केदार यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केल्याप्रकरणी २०२५ मध्ये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.