Beed Crime : केज येथील बरड फाट्यावरच्या रेणुका कला केंद्रात अल्पवयीन मुलीला डांबून छळ!

पार्टी मालकीण आणि कला केंद्राच्या मालकासह तिघांवर पोक्सोसह गुन्हा दाखल, पुन्हा रेणुका कला केंद्र चर्चेत
minor girl
Minor girl file photo
Published on: 
Updated on: 

केज :- केज जवळ असलेल्या बरड फाटा येथील रेणुका कला केंद्रावर एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने डांबून ठेवून तिला ग्राहकांसमोर नृत्‍य करण्यास भाग पाडले. तसेच अनैतिक धंद्यासाठी तिच्यावर बळजबरी करून तिला डांबून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारी वरून कला केंद्राचा मालक, संगीत पार्टीची मालकीण आणि अन्य एका विरुद्ध पोक्सोसह गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील गांगलवाडी ता. ब्रम्हपुरी येथील महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीला तिच्या एका ओळखीच्या प्रगती चाहंदे (रा. चांदली ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर) येथील महिलेने तिला लातूर येथे नोकरी व काम धंद्याचे अमिष दाखवून तिला लातूर येथे जाण्यासाठी दि. ३० जुलै २०२६ रोजी अडीच हजार रु. पाठविले. त्या नंतर ती अल्पवयीन मुलगी लातूर येथे गेल्या नंतर तिला प्रगती चाहंदे हिने तिला लातूर जिल्ह्यातील शिंदाडा येथील राधिका कला केंद्रात घेऊन गेली, परंतु तिचे वय कमी असल्याने तिला येथे काम करता येणार नाही, असे सांगितले. त्या नंतर प्रगती चाहांदे हिने अल्पवयीन मुलीला त्या कला केंद्रातील पार्टी मालकीण अंजली भारत चव्हाण (रा.चापडोहा, ता. जि. यवतमाळ) हिच्या धाराशिव जिल्ह्यातील येडशी येथील रूमवर पाठवून एका एमएससीआयटी केंद्रात तिचे वय बदलून बनावट आधार कार्ड तयार केले.

त्या नंतर दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी पार्टी मालकीण अंजली चव्हाण हिने त्या अल्पवयीन मुलीला केज तालुक्यातील बरड फाटा जवळील रेणुका कला केंद्रात घेऊन गेली. या बंद पडलेल्या कला केंद्राचे मालक सुजित शिनगारे (रा. अंबाजोगाई) व पार्टी मालक अंजली भारत चव्हाण यांनी अल्पवयीन मुलीचे वय कमी असल्याचे त्यांना माहीत असताना तिचे बनावट आधारकार्ड तयार करून तिला बळजबरीने नाचकाम करायला लावले. तेथे येणाऱ्या अनोळखी ग्राहक यांनी तिच्या सोबत अश्चिल चाळे केले आणि आणि पार्टी मालकीण अंजली हिने तिला ग्राहका सोबत अनैतिक सबंध ठेवण्यास सांगितले. तिने नकार देताच तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि बळजबरीने स्वयंपाक व धुणी भांडी करायला लावले.

या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादी वरून अंजली भारत चव्हाण, (रा. चापडोह, ता.जि. यवतमाळ), रेणुका कला केंद्राचे मालक डॉ. रामधन ढाकणे (रा. सारुळ ता. केज) आणि त्याचा साथीदार सूजित शिनगारे (रा. अंबाजोगाई जि. बीड) या तिघांच्या विरुद्ध नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राकेश नेटके हे करीत आहेत.

पार्टी मालकीण पोलिसांच्या ताब्यात !

गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवून पार्टी मालकिन अंजली भारत चव्हाण हिला ताब्यात घेतले असून दोघांच्या मागावर पोलिस आहेत.पीडित अल्पवयीन मुलीला डांबून ठेवल्या नंतर तिने पोलिसांच्या मदतीसाठी ११२ क्रमांकावर फोन करताच त्या लोकेशन आधारे पोलिसांनी तपास घेऊन मुलीची सुटका केली. त्या नंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला पोलिस ठाण्यात आणून तिची चौकशी करून तिच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल केला.

आणखी आरोपींची संख्या वाढू शकते :-

अल्पवयीन मुलीला फसवून तिच्ये कडून अनैतिक संबंधासाठी तिला डांबून ठेवणे आणि छळ केल्या प्रकरणी आणि तिचे बनावट आधार कार्ड तयार करून देणारे तसेच त्याच्या सोबत अश्लील चाळे करणारे ग्राहक यांचा तपास घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.