

नेकनूर : संभाजीनगरहून लातूरकडे चाललेला लातूर आगाराच्या एसटीची मागील दोन्ही चाके निखळली. पण सुदैवाने तब्बल शंभर फुट अंतरावर चालकाला बसवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने 70 प्रवाशांचा जीव बचावला. बाजूला निघालेले दोन्ही चाके शंभर दोनशे फुटावर जाऊन पडली होती.
शनिवारी दुपारी सव्वा एक वाजता नेकनूरजवळील मांजरसुंबा रस्त्यावर सफेपुर फाटानजीक लातूर आगाराची संभाजीनगर _लातूर MH 24 AU 8335 या लातूरकडे निघालेल्या चालत्या बसची मागील कंडक्टर बाजूची दोन चाके अचानक निखळून पडली. प्रसंगावधान राखत गाडीवर नियंत्रण मिळवत चालकाने फुल भरलेल्या जवळपास 70 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
एका बाजूला घसरत बस शंभर फुटांपर्यंत घासत गेली निखळलेले एक चाक बसच्या पुढे दोनशे फुटापर्यंत जाऊन पडले होते. लातूर आगाराच्या या बसचालकाचे नाव बंडेराव सदाशिव शिवरे असे असून प्रवाशांनी धन्यवाद व्यक्त करीत त्यांचे कौतुक केले. महामंडळाचा निष्काळजीपणा मोठ्या प्रमाणात प्रवाशावर बेतला असता मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.