

अंबाजोगाई/केज : भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सात ते आठजण जखमी झाले. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि.१६) दुपारी ३ च्या सुमारास नांदूर घाट परिसरात घडली. दरम्यान घटनास्थळाहून फरार झालेला कंटेनर पुढे चंदन सावरगाव येथील काही गाड्याना उडवत पुढे लोखंडी सावरगाव नजिक पलटी झाला. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी केजपासून पाठलाग करत पलटी झालेला तो कंटेनर जाळण्याचा प्रयत्न केला.
मीना प्रवीण घोडके (वय ३७) असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. तर कृष्णा हरिदास कापरे (वय २०, रा.कापरेवाडी, श्रद्धा मधुकर चिंचकर (वय १८,रा.येवता), सुनील सुंदर घुले (वय ५९, रा. केळगाव), बळीराम अप्पराव पांचाळ (वय ४०) सोनू बाबु शेख (वय २०) विकास वसुदेव काकडे (वय २२, रा.कापरेवाडी), कुमार गायकवाड (वय ५५, रा. देवगाव), शेषेराव मारुती चंदनशिवे (वय ५५, रा. शिरपुरा), सरिता रावसाहेब मुंडे (वय ५७, रा.चारदरी), फुलाबाई धोंडीराम सावंत (वय ६०, तुगाव), रावसाहेब यादवराव मुंडे (वय ७०) विद्या विलासराव सूर्यवंशी (वय ३०), विलासराव ज्ञानोबा सूर्यवंशी (वय ४०), सिद्धेश्वर वसुदेव कापरे (वय २२, युसुफ वडगाव), सिद्धार्थ शिंदे (वय ५२),अतुल बाबुराव कुलकर्णी (वय ४०) अशी जखमींची नावे आहेत.
शुक्रवारी दुपारी बीडकडून भरधाव वेगात आलेल्या कंटनेर चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने नांदूर घाट परिसरात काही जणांना धडक दिली. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर सात- आठजण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी या कंटेनरचा पाठलाग केला असता भारधाव निघालेल्या कंटेनर आंबेजोगाईजवळ काही वाहनांना चिरडत पुढे लोखंडी सावरगाव येथे पलटी झाला. संतप्त जमावाने हा कंटेनर पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे.