

आष्टी : तालुक्यातील ब्रह्मगाव येथील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेल्या शृंगेरी देवी मंदिरात सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. चोरट्यांनी देवीचे चांदीचे दोन टोप आणि काही नकली दागिने लंपास केले आहेत. विशेष म्हणजे, चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी मंदिरातील सीसीटीव्हीचे वायर कापले होते, मात्र देवस्थानच्या कार्यालयासमोर असलेल्या कॅमेऱ्यात एक संशयास्पद फुटेज हाती आले आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असतानाच, आष्टी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. चोरीला गेलेल्या चांदीच्या टोपांची अधिकृत खरेदी पावती देवस्थानकडे उपलब्ध नसल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विजय फराळ यांनी दिली आहे.
देवीला अनेक भक्त श्रद्धेपोटी दागिने किंवा वस्तू भेट स्वरूपात देत असतात, अशा वेळी त्याची पावती असणे शक्य नसते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक कारणावरून तक्रार नाकारल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शृंगेरी देवी मंदिर हे महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे मोठी वर्दळ असते. मात्र, या मंदिरात चोरी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दीड वर्षांपूर्वी देखील अशाच प्रकारे मंदिरात चोरी झाली होती आणि त्यावेळीही चांदीचे टोप चोरीला गेले होते. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे देवस्थान ट्रस्ट त्रस्त झाला असून मंदिराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.