

Beed Shirur Kasar Leopard Attack
शिरूर कासार : शिरूर कासार तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी भयग्रस्त झाले आहेत. सोमवारी (दि.१) पहाटेच्या सुमारास वारणी शिवारातील गट नं. 465, जुनी बीड–पांदी रस्ता परिसरातील डोंगरे वस्तीच्या शाळेजवळील शेतात बिबट्याने हल्ला चढवला.
या हल्ल्यात शेतकरी संतोष श्रीमंत केदार यांचा साडेचार वर्षांचा पाळीव ‘लयजा’ नावाचा स्वान बिबट्याच्या तावडीत सापडून ठार झाला. लयजाने म्हैस, वासरे, शेळ्या, गायी, बैल अशा पशुधनाचे रक्षण करताना प्रतिकार केला. दिवसभर सुरू असलेल्या शोधाशोधीनंतर सायंकाळी चार वाजता तो पूर्ण खाल्लेल्या अवस्थेत मृतावस्थेत आढळून आला. त्याची अंदाजे किंमत सुमारे 60 हजार इतकी होती.
लयजावर जीवापाड प्रेम करणारी मुले, तसेच परिसरातील सर्वजण हा अत्यंत भीषण प्रकार पाहून भयभीत झाले. केदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी वनरक्षक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता, “आज येऊ शकत नाही, उद्या पाहू,” असे सांगून त्यांनी फोन बंद केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
“लयजाने आमच्या पशुधनावर किंवा कुटुंबावर जीवितहानी होऊ दिली नाही. त्याला औषधोपचार, देखभाल आणि प्रेमाने वाढवले होते. आजच मी वनअधिकाऱ्यांकडे तक्रार देऊन पंचनामा करण्याची मागणी करणार आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही सहकार्य करावे.”
संतोष केदार, शेतकरी