

Beed Shirur Fulsangvi dam water level
शंकर भालेकर
शिरूर : मराठवाड्यासह राज्यात गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला, ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले. पण या पावसालाही अपवाद ठरला फुलसांगवी साठवण तलाव. परिसरात पाण्याचा बराच अभाव असल्याने तलावाची पाणीपातळी अद्यापही तळालाच आहे. त्यामुळे यावर्षी तलाव भरून शेतकऱ्यांची तहान भागणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
सन 2006 मध्ये या तलावाचे काम पूर्ण झाले. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पाइपलाइन टाकली, विहिरी खोदल्या, पण अपेक्षेप्रमाणे तलाव कधीच भरला नाही. फक्त 2021 सालीच तलाव प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर मात्र दरवर्षी अपुरा पाऊस पडल्याने तलाव कोराच राहतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणीटंचाईला समोरे जावे लागते.
फुलसांगवी साठवण तलावाच्या पाणलोट क्षेत्रात तांदळा, सैदापूर, कहार ओढा व काजाळा येथील पाझर तलाव आहेत. या पाझर तलाव व परिसरातील छोटे बंधारे भरल्यावरच फुलसांगवी तलावात पाणी पोहोचते. मात्र यंदा अजून पुरेसा पाऊस झालेला नाही.
2020 आणि 2021 मध्ये मुसळधार पावसामुळे तलाव भरल्याने हजारो एकर क्षेत्र बागायती झाली होती. पण यानंतर पुन्हा कोरड्या हवामानामुळे शेती कोलमडली. त्यामुळे आता वरून राजा पुन्हा दयामाया करून दमदार पाऊस पाडेल, या आशेवर शेतकरी नजर लावून बसले आहेत.