

मनोज गव्हाणे
नेकनूर: रविवारी (दि.१४) सकाळी सुरू झालेला पाऊस दुपारनंतर उघडला खरा मात्र रात्री साडेसातला पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाल्याने बाजार करून परतणाऱ्या अनेकांना घरापर्यंत उशिरापर्यंत पोहोचता आले नाही.
अनेक ओढे तुडुंब वाहू लागल्याने काळे वस्ती, गवळवाडी, सावंतवाडी, बाळापुर, आंबील वडगाव, कुंभारी आदी भागातील नागरिकांना पाणी ओसरण्याची वाट पाहत आहे तिथेच अधिकाळ थांबावे लागले. शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, नेकनूर मधील व्यावसायिक तळघर पाण्याखाली आली आहेत.
शनिवार, रविवार सलग पावसाने नेकनुरकरांचे मोठे हाल झाले आहे. रविवारी सकाळी बाजार भरण्याच्या मार्गावर असतानाच पावसाची सुरुवात व्यापाऱ्यांना अडचणीची ठरली. दुपारनंतर पाऊस थांबला मात्र बाजारात चिखलाने बाजारकरूंचे, व्यवसायिकांचे मोठे हाल झाले. सायंकाळी साडेसातलाच मोठ्या पावसाला सुरुवात झाली तास दीड तासात ढगफुटी सदृश्य पावसाने पाणीच पाणी केले.
यामुळे घराकडे चाललेले अनेक ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यावरील नागरिकांना घराकडे जाताना ओढ्याच्या पाण्याने पुलावरून जाणे शक्य झाले नाही. रात्री उशिरापर्यंत त्यांना पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागली. काढनीसाठी आलेले सोयाबीन, लावलेला कांदा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरसकट मदतीची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.