

माजलगाव: खेडेगावाला व्यापार करण्यासाठी मोटरसायकल वरून जाणाऱ्या माजलगावच्या सराफा व्यापाऱ्याला लुबाडण्यात आल्याची थरारक घटना रविवारी (दि.25) सकाळी घडली. यावेळी अज्ञात चोरट्यांनी व्यापाऱ्याच्या मोटरसायकलचा पाटलाग करत शास्त्राचा दाखवत व्यापाऱ्याकडील सोने आणि चांदी लुटले. साडेतीनशे ग्रॅम सोने ज्याची अंदाजे किंमत 50 लाख रुपये असून तीन किलो चांदी ज्याची अंदाजे किंमत 10 लाख रुपये आहे. दरम्यान दिवसाढवळ्या झालेल्या या थरारक रोड रॉबरीने माजलगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
माजलगाव शहरातील हनुमान चौक येथे अमोल पंढरीनाथ गायके यांचे अमोल ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी (दि.25) सकाळी 9 वाजता अमोल गायके माजलगाव वरून व्यवसाय करण्यासाठी मोटारसायकलवरून खेडेगावला जात होते. तालखेड फाट्याजवळ त्यांची मोटरसायकल आली असता पाठीमागून अज्ञात चोरटे चार चाकी वाहनातून त्याचा पाठलाग करत आले. यावेळी त्यांनी सराफा व्यापाऱ्याच्या मोटरसायकलला गाडी आडवी लावत कोयता, सततुर शस्त्राचा धाक दाखवला.जीवे मारण्याची धमकी दिली.व व्यापाऱ्याच्या हातातील सोन्या चांदीची बॅग हिसकावली.ज्यात साडेतीनशे ग्रॅम सोन्याचे अलंकार होते.(ज्याची अंदाजे किंमत 50 लाख रुपये)तर तीन किलो चांदीचे अलंकार होते ज्याचे अंदाजे किंमत 10 लाख रुपये आहे.
अज्ञात चोरट्यांनी आपल्या घटनास्थळावरून पलायन केले. दरम्यान या घटनेची माहिती थोड्याच वेळात माजलगाव शहरात वाऱ्यासारखी पसरली असून या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर सराफ व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच माजलगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात नाकाबंदी केल्याची माहिती आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज,आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, सराफ व्यापार्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रवासादरम्यान पोलिस संरक्षण आणि नियमित गस्त वाढवण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रकरणी माजलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.