

Beed News: Young farmer earns income of six lakh rupees from Ghewda crop
गौतम बचुटे
केज, पुढारी वृत्तसेवा: शेती हा जरी आतबट्ट्याचा खेळ म्हणून निसर्गावर अवलंबून असला तरी प्रत्येक संकट ही संधी समजून त्या प्रमाणे नियोजन केले आणि अभ्यास करून जर पिकाची लागवड केली तर हमखास यश मिळण्याची शक्यता जास्त असते. अशाच केज तालुक्यातील एका अल्पशिक्षित युवा शेतकऱ्याने त्याच्या अर्ध्या एकर पेक्षा कमी क्षेत्रात घेवडा या पिकाचे आतापर्यंत सुमारे पाच लाखांचे उत्पन्न घेतले आहे. तसेच या पिकात दोन अंतर पिके सुद्धा घेतली आहेत त्याचे सुद्धा सुमारे दीड लाखांचे उत्पन्न मिळाले असून आणखी तीन ते चार लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
केज तालुक्यातील एका अल्पशिक्षित युवा शेतकरी भागवत मुळे यांनी त्याच्या अवघ्या अर्ध्या एकर पेक्षा कमी क्षेत्रात त्यांनी घेवडा लावला. त्याला व्यवस्थित खत आणि पाण्याचे नियोजन करून वेलीला आधार देण्यासाठी बाबूंच्या काठ्या आणि तारेची बांधणी केली. त्या नंतर सुमारे ६० ते ७५ दिवसात त्याला फुले लागली आणि फळधारणा झाली. एका आठवड्याला सुमारे दहा क्विंटल म्हणजेच एक टन एवढा माल निघत आहे.
कळंब येथील बाजारपेठेत व्यापाऱ्याकडून त्यांच्या वाणाला चांगली मागणी आहे. आता पर्यंत २०० क्विटल म्हणजेच २० टनाच्या आसपास माल निघाला असून प्रति क्विंटल ४०००, ते ६००० रु. असा भाव मिळाला आहे. जरी अतिवृष्टी झाली किंवा अवर्षण असले तरी जर शेतकऱ्याचा एक जरी कोपरा पिकला तरी शेतकऱ्याचे दारिद्रय संपते. त्यासाठी चालू घडामोडीचा अंदाज घेऊन पिकाची निवड करायला हवी असे भागवत मुळे यांनी सांगितले.
आंतरपिकातूनही निघाले चांगले उत्पन्न
याच घेवड्याच्या पट्ट्यामध्ये त्यांनी प्रथम पत्ता कोबीचे पीक घेतले. कोबीने त्यांना सुमारे ४० हजार रुपये मिळवून दिले. कोबी निघाल्यानंतर त्याच घेवड्यामध्ये त्यांनी कोथिंबीर लावली आणि कोथिंबीर विक्रमी भाव मिळाला. सुमारे दीडशे ते अडीचशे रुपये किलो दराने त्यांनी कोथिंबीर विकली. त्या कोथिंबीरीचा देखील त्यांना ७५ हजार ते ८० हजार रु. चे उत्पन्न मिळवून दिले.