

अंबाजोगाई : - अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा शिवारात एका अज्ञात आणि हिंस्त्र श्वापदाने मोठा हाहाकार माजवल्याचे आढळून आले आहे. रविवारी रात्री या श्वापदाने एका शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून तब्बल सात शेळ्यांना ठार केले. या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे १ लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत पसरली आहे.
डोंगर पिंपळा येथील शेतकरी बळीराम बाबुराव केंद्रे हे आपल्या शेतात जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालन सुरू केले होते. या शेळीपालनासाठी शेतातच त्यांनी शेड उभारले आहे. केंद्रे यांच्याकडे सहा मोठ्या शेळ्या आणि एक लहान पिल्लू असे एकूण सात शेळ्यांचे पशुधन होते.
रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी रात्री १० वाजता त्यांनी शेळ्यांना चारापाणी करून ते झोपण्यासाठी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हिंस्त्र श्वापदाने त्यांच्या शेडवर हल्ला केला. या हिंस्त्र श्वापदाने गोठ्याच्या संरक्षणासाठी लावलेल्या सहा फूट उंचीच्या जाळीवरून सहज उडी मारून आत प्रवेश केला. आत शिरताच त्याने सातही शेळ्यांना ठार मारून त्यांचा फडशा पाडला. सोमवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर बळीराम केंद्रे यांना धक्का बसला. या घटनेमध्ये त्यांचे सुमारे १ लाखांहून अधिक रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सदरील घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने घटनास्थळी पोचून पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रतन तळेकर आणि डॉ. अभिषेक अबुज यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृत शेळ्यांचे शवविच्छेदन केले. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने या हिंस्त्र श्वापदाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी डोंगर पिंपळा येथील ग्रामस्थांनी केली आहे.