

बीड, ः परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा दोन वर्षांपूर्वी धारदार शास्त्र शस्त्राचे वार करून खून झाला होता.त्या प्रकरणाचा अद्याप तपास सुरू असताना आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे.. या तपासात वाल्मीक कराड याच्या टोळीतील काही लोकांना ताब्यात घेतले असून यामुळे वाल्मीक कराड याची मुले सुशील कराड व श्री गणेश कराड यांच्याकडून माझ्या परिवारातील सदस्यांना धोका असल्याची भिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी शुक्रवारी अपर पोलिस अधिक्षक व पोलिस अधिक्षकांना अर्ज देखील दिला आहे.
महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी या पती महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास लागावा यासाठी गेल्या दोन वर्षांपासून संघर्ष करत आहेत. या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून सुरु असून दोनच दिवसांपूर्वी एका संशयीताची ब्रेन मॅपिंग व दोघांची नार्को टेस्ट मुंबई येथे करण्यात आलेली आहे . त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी असतांना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सुरक्षेसाठी अर्ज दिल्याने खळबळ उडाली आहे.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिस अधिक्षकांना दिलेल्या अर्जामध्ये माझ्या परिवारातील सदस्य दत्तात्रय मुंडे, अशोक मुंडे, प्रणव मुंडे, पंकज मुंडे, प्रवीण मुंडे, व माझा भाऊ सतीश फड, वडील भगवान फड यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे... माझ्या परिवारातील या सदस्या बाबत काही अनपेक्षित, अनैसर्गिक घटना घडल्यास सुशील वाल्मीक कराड व श्रीगणेश वाल्मीक कराड हे जबाबदार राहतील असा तक्रार अर्ज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी बीडचे पोलीस अधीक्षकांना दिला आहे.
दरम्यान महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मीक कराड यांच्या घरी काम करणाऱ्या दोघांच्या नार्को टेस्ट केल्याची माहिती समोर आली होती. त्या पाठोपाठ आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी अशा पद्धतीने अर्ज दिल्याने या प्रकरणाशी वाल्मीक कराड व त्याच्या मुलांचा काही संबंध आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत असून एसआयटीच्या तपासातूनच यातील सत्य समोर येऊ शकणार आहे.
दोन दिवसांपूर्वी मुलांना शिवीगाळ, कडे फेकून मारले
दरम्यान ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मुलाला दोन दिवसापूर्वी एका अनोळखी मुलाने काहीही कारण नसताना शिवीगाळ केली तसेच हातातील कडे फेकून मारले या प्रकारामुळे घाबरलेल्या मुंडे कुटुंबीयांनी या प्रकरणाचा तपास करणारे पंकज कुमावत यांना संपर्क साधला तसेच पोलीस अधीक्षकांना देखील अर्ज दिला आहे... याबरोबरच खासदार सुप्रिया सुळे यांना देखील याबाबतची माहिती दिली असून त्यांनी या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना बोलणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीते हा देखील फरार आहे.. ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड हे या सर्व प्रकरणाचा पाठपुरावा करत आहेत त्यामुळे गोट्या गीते याच्यापासून परिवाराला तसेच फड यांना धोका होऊ शकतो अशी भीती देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली.