

Beed News: Shepherds are busy shearing the sheep
शिवनाथ जाधव
टाकरवण, पुढारी वृत्तसेवा : धनगर, ठेलारी, समाजामध्ये सध्या मेंढ्यांची लोकर कातरण्याची धांदल उडाली आहे. सालाबादप्रमाणे संक्रांतीच्या अगोदर धनगर, ठेलारी, समाज मेंढ्यांना पाण्याने स्वच्छ धुऊन संक्रांतीच्या अगोदर किंवा संक्रांतीनंतर मेंढपाळांना बोलवून मेंढ्यांची लोकर कापली जाते. लोकर कापण्यासाठी मेंढपाळांना आमंत्रण दिलं जातं, लोकर कापणी झाल्यानंतर त्यांना पुरणपोळीचे गोड धोड जेवण दिलं जातं, ही पूर्वी पासून परंपरा आहे.
लोकर कातरण्यापूर्वी दोन ते तीन दिवस अगोदर मेंढ्या धूतल्या जातात. मेंढ्यांची कातरणी दोन प्रकारची असते. एक सरळ कातरणी असते. समान पट्टीच्या रेषेत दोन रेघा काढतात. तर दुसरी तास पद्धत आहे. मेंढराच्या पाठीवर तिरक्या रेषा काढून त्याला गोंडे काढले जातात त्याला तास पध्दत म्हणतात. पूर्वी कातरकरी सामूहिक (इर्जिक) पध्दतीने मेंढयांची लोकर कातरणीचे काम करायचे. आज एकाची, उद्या दुसऱ्याची तर परवा तिसऱ्याची अशी मेंढरांची लोकर कातरत असतात. काही भागात लोकर ऑगस्ट व डिसेंबर अशी वर्षातून दोनवेळा कातरली जाते.
पूर्वीची इर्जिक पध्दत बंद होऊ लागली आहे सध्या रोजगार देऊन लोकर कातरावी लागत आहे. एक कातरकरी साधारण दिवसभरात सात ते आठ मेंढरे कातरतो. सध्या मेंढपाळ वर्ग मेंढराची लोकर कातरणारी संख्या कमी होत चालली आहे. सध्याच्या तरुण मेंढपाळांना लोकर कातरणी करण्याचा छंद कमी झाल्याने कातरकऱ्यांची चांदी सुरू झाली आहे. सगळीकडे एकाच वेळी मेंढरांची लोकर कातरत असल्याने कतरकऱ्यांचा शोध घ्यावा लागत आहे.
काळ्या लोकरीला दर चांगला मिळतो. पांढऱ्या, तांबड्या लोकरीला चांगला दर मिळत नाही. त्यामुळे कधी कधी तर लोकर फुकट द्यावी लागत असल्याचे मेंढपाळ सांगत आहेत. सध्या कातरणीसाठी लगबग सुरू आहे. कातरकऱ्यांची संख्या कमी असल्याने मेंढपाळांना कातरकरी शोधण्यासाठी कसरत करावी लागते मेंढरे कातरण्यासाठी एकाच वेळी आल्याने कातरऱ्यांना सुगीचे दिवस.
अनेक रोगांवर मेंढ्यांची लोकर उपयुक्त ठरते, लोकरीपासून जेन आणि घोंगडे बनवलं जातं, जेन आणि घोंगड वापरात असेल तर अनेक रोगांपासून बचाव होतो. त्यामुळे घोंगडी आणि जेनाला जास्त मागणी आहे परंतु मेंढपाळांची संख्या कमी होत आहे, तरुण वर्गाने ही मेंढपाळ व्यवसायाकडे पाठ फिरवली आहे असे मेंढपाळ बबन सातपुते यांनी सांगितले.