

कडा : शेंडगेवाडी (सावरगाव गड), ता. आष्टी येथील ऊसतोडणी कामगारांवर गुरुवारी पहाटे अपघाताचा कराळ झटका बसला. वृद्धेश्वर साखर कारखाना, पिंपळगाव कासार (तिसगाव) येथे तोडणीसाठी जात असताना तिसगाव-शेवगाव मार्गावर समोरून येणाऱ्या टाटा चेसिस वाहनाने अचानक विरुद्ध दिशेने येऊन बैलगाड्यांना जोरदार धडक दिली. धडकेत बैलगाड्या तब्बल 200 फूट फरफटत गेल्या. या घटनेत पाच बैलांचे हाडे मोडली असून एक बैल जागीच ठार झाला.मजुरांची उपजीविका उद्ध्वस्त करणारी ही गंभीर हानी मानली जात आहे.
14 ऊसतोडणी मजूर जखमी
गंभीर जखमी मध्येपूजा नाना शेंडगे (30)शरद शेंडगे (40) दोघांना पुढील उपचारासाठी इंपल्स हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे हलविण्यात आले. उर्वरित 12 मजूर त्यात अभिषेक मरगळ, विशाल मरगळ, कोमल ठेंगल, राणी ठेंगल, सीमा शेंडगे, संगीता शेंडगे, राणी गोल्हार, बबन शेंडगे, लिलाबाई शेंडगे, आदित्य शेंडगे,अशोक ठेंगल, तुळजाई शेंडगे यांच्यावर हॉस्पिटल,तिसगाव येथे उपचार सुरू आहेत.
आमदार सुरेश धस घटनास्थळी दाखल
पहाटे सहाच्या सुमारास अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना तातडीने माहिती देत जखमींना त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले.आमदार धस यांनी तिसगाव येथील रुग्णालयात जखमींची भेट घेऊन उपचारांची माहिती घेतली. तसेच पाथर्डी पोलीस ठाण्याचे पो.उ.नि.पुजारी यांच्याकडे योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली, तसेच या मार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांवर नियंत्रण ठेवले जावे, दोषी वाहनचालकावर तात्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.