

Beed News : Make Arrest Dr. Patwa; 500 citizens sit in front of Kada police station
कडा, पुढारी वृत्तसेवा : गेल्या वीस दिवसांपासून अहिल्यानगर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या नावाखाली अटकेपासून पळ काढणाऱ्या डॉ. महेंद्र पटवा यांच्या अटकेच्या मागणीसाठी शनिवारी (दि.१९) कडा शहरातील नागरिकांचा संताप अनावर झाला. सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल दोन तास सुमारे ४०० ते ५०० नागरिकांनी कडा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. पटवा रुग्णालयात दाखल असल्याचा बनाव करून अटकपूर्व जामीन मिळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा थेट आरोप आंदोलकांनी केला. पोलिसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता डॉ. पटवा यांच्यावर तातडीने कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आंदोलकांनी उपअधीक्षक अधिकारी भारत पांढरे यांनी स्वतः आंदोलनस्थळी यावे, अन्यथा ठाण्यासमोरून हटणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यानंतर पांढरे यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधत निवेदन स्वीकारले. यावेळी त्यांनी "उपलब्ध वैद्यकीय कागदपत्रे आणि सिव्हिल सर्जनचा अहवाल तपासून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. आरोपीला सोडले जाणार नाही," असा शब्द त्यांनी दिल्यानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. दरम्यान चार दिवसांत पटवा यांना अटक न केल्यास कडा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
बोगस प्रमाणत्र देणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करा
डॉ. पटवा यांना 'बोगस अनफिट' असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणाऱ्या संबंधित डॉक्टरचीही सखोल चौकशी करण्यात यावी. चौकशीत गैरप्रकार आढळल्यास त्या डॉक्टरला या गुन्ह्यात सहआरोपी करावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली. तसेच सिव्हिल सर्जनच्या अहवालातून वैद्यकीय स्थितीची खरी वस्तुस्थिती स्पष्ट करून त्यानुसार पुढील कारवाई करावी, असा आग्रह धरण्यात आला.