

Beed News: Five-year-old custard apple orchard razed due to lack of water
पिंपळणेर, पुढारी वृत्तसेवा : पावसाने पाठ फिरवली, विहिरी-बोअरवेल आटल्या आणि पाण्याअभावी जगवलेली फळबाग डोळ्यांदेखत करपण्याची वेळ आली. अखेर उत्पादनापूर्वीच पाच वर्षे जपलेली सिताफळाची बहारदार बाग जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्याचा निर्णय शेतकऱ्याला घ्यावा लागला.
बीड तालुक्यातील लिंबारुई देवी येथील शेतकरी अंगद मनोहर पैठणे यांच्या एक हेक्टर क्षेत्रातील सुमारे दोन हजार सिताफळ रोपांची बाग पाण्याअभावी मोडण्यात आली. दुष्काळाची ही झळ फळबागायतदार यांच्या आर्थिक संकटाची तीव्रता अधोरेखित करणारी आहे.
बीड तालुक्यातील पिंपळनेर महसूल मंडळात यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. अल्प पावसामुळे खरीप पिकांबरोबरच रब्बी हंगामातील पिकांवर संकट ओढवले आहे. परतीच्या पावसाने हुलकावणी दिल्याने ऑक्टोबरमध्ये उष्णतेची तीव्रता वाढली. परिणामी शेतातील विहिरी आणि बोअरवेल मधील पाणी पातळी झपाट्याने खालावली असून, फळबागांना पाणी देणेही अशक्य बनले आहे.
अंगद पैठणे यांनी पाच वर्षांपूर्वी एक हेक्टर क्षेत्रात सुमारे दोन हजार सिताफळांची रोपे लावली. जिवापाड मेहनत घेत त्यांनी ही बाग वर्षानुवर्षे जोपासली. पाणी, खत, औषधांसह मशागतीवर मोठा खर्च करून बाग वाढवली. काही वर्षांत बाग बहारदार झाली आणि उत्पादनातून आर्थिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली. मात्र, यंदा पावसाने दगा दिल्याने बागेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध झाले नाही.
हिरवीगार बाग पाण्याअभावी सुकू लागल्याने अखेर ती वाचवणेच अशक्य झाले. पाण्याच्या संकटाबरोबरच सिताफळाला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याचीही शेतकऱ्यांची व्यथा आहे. उत्पादनासाठी मोठा खर्च करूनही बाजारपेठेत योग्य दर मिळत नसल्याने नफ्याऐवजी तोटाच पदरी पड़त असल्याचे पैठणे यांनी सांगितले. यंदा पावसानेही साथ सोडल्याने बाग जगवण्यासाठी लागणारे पाणी उपलब्ध झाले नाही. त्यामुळे पाच वर्षांची मेहनत आणि खर्च डोळ्यांसमोर ठेवूनही नाईलाजाने संपूर्ण बाग जेसीबीच्या सहाय्याने मोडावी लागली.
पाच वर्षांची मेहनत काही तासांत संपली
फळबाग उभी करण्यासाठी शेतकरी अनेक वर्षे मेहनत घेतो. रोपांची लागवड, त्यांची जोपासना, पाणी, खत आणि औषधांवर खर्च केल्यानंतर बाग उत्पादनक्षम होते. मात्र, पाणीच उपलब्ध नसल्यास ही संपूर्ण गुंतवणूक वाया जाण्याची वेळ येते. पैठणे यांच्या सिताफळ बागेची झालेली वाताहत ही केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून, पावसाअभावी फळबागायतदारांसमोर उभ्या राहिलेल्या गंभीर संकटाचे चित्र आहे.