

Beed News: Amruta Fadnavis inaugurates the mega health camp in Ashti
आष्टी, पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मुख्यमंत्री महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आष्टी, पाटोदा, शिरूरसह परिसरातील विविध भागांतील सुमारे ४५ हजारांहून अधिक रुग्णांनी नोंदणी केली, तर रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि नागरिक मिळून तब्बल ६५ हजारांहून अधिक उपस्थिती नोंदवली गेली. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या महाआरोग्य शिबिरांपैकी एक म्हणून या उपक्रमाची नोंद झाली.
समारोप सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या अमृता फडणवीस यांनी वाढदिवस साजरा करण्याच्या विधायक संकल्पनेचे कौतुक करताना सांगितले की, "देशातील अन्नदाता शेतकरी सातत्याने कष्ट करत असल्यामुळे तो सुदृढ आहे आणि बळीराजा सुदृढ असल्यामुळेच भारत देश सशक्त आहे. वाढदिवसाच्या नावाखाली अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजोपयोगी उपक्रम राबविणे अधिक महत्त्वाचे आहे.
आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर महाआरोग्य शिबीर आयोजित करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे."
बीड जिल्ह्यात प्रथमच आल्याचे सांगत त्यांनी येथे मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, आयुष्मान भारत, महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि धर्मादाय मदत कक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोफत उपचार उपलब्ध होत असल्याचे सांगून आष्टी येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी बोलताना आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाल्याचे सांगितले.
"२०१४ नंतर रुग्णालयांची संख्या वाढविणे, उपचारांच्या कक्षेत अनेक गंभीर आजारांचा समावेश करणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मदत उपलब्ध करून देणे या निर्णयांमुळे राज्यातील लाखो रुग्णांना नवजीवन मिळाले आहे," असे ते म्हणाले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्या शिफारशीवर हजारो रुग्णांना लाखो रुपयांची मदत मंजूर झाल्याचे सांगत त्यांनी आष्टी येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करू, अशी भूमिका स्पष्ट केली.
समारोप सोहळ्यात पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना नियमित व्यायाम, संतुलित जीवनशैली आणि लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. या महाआरोग्य शिबिरात पुणे, बीड, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकांनी सेवा दिली. विविध आजारांवरील तपासण्या, निदान व औषधोपचार करण्यात आले.
गंभीर रुग्णांना पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयांत दाखल करण्यात येणार असून, आवश्यक शख्त्रक्रिया शासनाच्या विविध आरोग्य योजनांतर्गत मोफत करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दिवसभर हजारो रुग्ण, त्यांचे नातेवाईक, स्वयंसेवक आणि वैद्यकीय पथकांमुळे आष्टी शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वसामान्यांना दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रभावी उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.