

अंबाजोगाई :- अंबाजोगाई येथील मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी पहाटे दोन वेडसर महिलांनी चांगलाच धुमाकूळ घातला. एकमेकींना हाणामारी करण्यापासून ते एसटी चालकांना शिवीगाळ करण्यापर्यंत या महिलांची मजल गेली. विशेष म्हणजे, भर रस्त्यात बसेस अडवून 'भानामती' सदृश्य प्रकार केल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. या सर्व प्रकारामुळे बसस्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचे वाभाडे निघाले असून, आगार प्रशासनाच्या सुस्त कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
शुक्रवारी सकाळी ६ ते ७ च्या सुमारास, जेव्हा बसस्थानक प्रवाशांनी गजबजलेले होते, तेव्हा दोन वेडसर महिलांनी अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या महिलांनी आपापसात जोरदार हाणामारी केली. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा एसटी बसेसकडे वळवला. धावत्या बसेससमोर उभ्या राहून त्यांनी बस चालकांना आणि वाहकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. केवळ गोंधळ घालूनच या महिला थांबल्या नाहीत, तर त्यांनी बसेसच्या समोर येऊन लिंबू कापले आणि विचित्र हातवारे करण्यास सुरुवात केली. हा प्रकार 'भानामती' किंवा करणी-बाधेसारखा वाटत असल्याने उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीची लाट पसरली. या अघोरी प्रकारामुळे अनेक प्रवाशांनी बसमध्ये चढण्यासही धास्ती घेतली होती.
या सर्व थरारादरम्यान त्यांना रोखण्यासाठी ना एसटीचे सुरक्षा रक्षक पुढे आले, ना तिथे कोणी पोलीस कर्मचारी उपस्थित होता. गेल्या अनेक दिवसांपासून या बसस्थानकात वेडसर व्यक्तींचा वावर वाढला आहे, परंतु आगार प्रमुखांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. "बसस्थानकात कधीच वर्दीतील पोलीस दिसत नाहीत, त्यामुळे गुंडप्रवृत्तीच्या आणि अशा वेडसर लोकांचे फावते," अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने दिली.
बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण असतानाही तिथे प्रवाशांना असुरक्षित वाटणे ही गंभीर बाब आहे. भविष्यात अशा व्यक्तींकडून प्रवाशांवर शारीरिक हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आणि एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तातडीने लक्ष देऊन अंबाजोगाई बसस्थानकात चोवीस तास पोलीस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
अंबाजोगाई बसस्थानकामध्ये वेड्या महीलांचा आणि वेड्या पुरुषांचा वावर वाढत असल्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबाजोगाई बसस्थानक हे गर्दिचे ठिकाण असल्यामुळे रात्री मध्यरात्री प्रवाशांची रहदारी असते. त्यामुळे सदर प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. अंबाजोगाई बसस्थानकामध्ये फिरणाऱ्या वेड्या महिलांचा आणी पुरुषांचा बंदोबस्त करण्यात यावा. व रा.प. महामंडळास सहकार्य करावे. असे निवेदन अंबाजोगाईचे आगर प्रमुख यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे.