

बीड : बीड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) श्रीमती प्रेमलता परवे विराजमान झाल्या असल्या, तरी सभागृहात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने आता उपनगराध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमताचा जादुई आकडा कोण पार करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजपने बेरजेचे राजकारण सुरू केले आहे, तर राष्ट्रवादीमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे.
बीड नगर परिषदेचे संख्याबळ त्रिशंकू अवस्थेत आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार गट) 18 नगरसेवक आहेत. त्याखालोखाल भाजपकडे 16, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 12, शिवसेना (शिंदे गट) 3, शिवसेना (ठाकरे गट) 1, काँग्रेस 1 आणि एमआयएम 1 असे बलाबल आहे. कोणत्याही पक्षाकडे स्वतःच्या बळावर उपनगराध्यक्ष निवडून आणण्याइतपत संख्या नसल्याने फोडाफोडी आणि जुळवाजुळवीच्या राजकारणाला वेग आला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपनगराध्यक्षपदासाठी तीन दिग्गज नगरसेवक इच्छुक आहेत. हे तिन्ही उमेदवार अनेकदा निवडून आलेले असल्याने त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. त्यामुळे कोणाला संधी द्यायची, हा पेच नेतृत्वापुढे आहे. या निवडीचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार आहेत.
दुसरीकडे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी अजित पवार गटाला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयावर त्यांच्याच गटातील नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “आम्हाला विश्वासात न घेता हा निर्णय कसा घेतला?“ असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात संदीप क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. ही नाराजी मतदानात उलटणार का, याकडे लक्ष आहे.
भाजपची वेट अँड वॉच भूमिका
विरोधी बाकावर असलेल्या भाजपनेही उपनगराध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असून, इतर पक्षांतील नाराज नगरसेवक आपल्या गळाला लागतात का? याची चाचपणी भाजप करत आहे. जर विजयासाठी आवश्यक संख्याबळ जुळले तरच भाजप निवडणुकीच्या रिंगणात उडी घेणार आहे, अन्यथा ते लांब राहण्याची शक्यता आहे.
बीडच्या राजकारणात काहीही शक्य!
बीड जिल्ह्याचे राजकारण नेहमीच अनपेक्षित वलनांसाठी ओळखले जाते. अनेकदा वर्तवलेले अंदाज फोल ठरवून, ऐनवेळी भलतेच समीकरण जुळून येते. त्यामुळे 15 जानेवारीला होणाऱ्या या निवडणुकीत संख्याबळ कोणाच्या बाजूने झुकणार आणि कोण बाजी मारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.