

Beed MP Bajrang Sonawane Dnyaneshwari Munde Hospital
बीड पुढारी वृत्तसेवा : पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळत नसल्याच्या तीव्र भावना मनात बाळगून आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या परळीच्या ज्ञानेश्वरी मुंडेंना गुरुवारी (१७ जुलै) खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन सांत्वनपर भेट दिली. ताई, तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या लढ्याला माझा खंबीर पाठिंबा असेल. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मी स्वतः मैदानात उतरेन, असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.
ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या पतीचा ऑक्टोबर २०२३ मध्ये निघृण खून झाला होता. या घटनेनंतरही आजतागायत तपासात कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी बुधवारी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत त्यांना थांबवले, मात्र त्यानंतर त्यांनी गाडीत बसून फळरसाच्या बाटलीत विष घेतल्याचे निदर्शनास आले.
सध्या त्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. खा. सोनवणे हे मुंबईहून परतल्यानंतर थेट जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी ज्ञानेश्वरी यांची भेट घेऊन तुमच्या लेकरांच्या चेहऱ्याकडे पाहून जगायचंय, खंबीर व्हा. सरकारकडून अपयश असलं तरी मी तुमच्यासोबत आहे, असे भावनिक उद्गार काढले.
मी न्यायासाठी प्रशासनाच्या दारात दररोज जाते. मुलांची शाळाही बुडते. माझ्या मनाला यातून असह्य वेदना होतात, अशी हृदयद्रावक भावना ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या व्यथेला ऐकणारे कान आणि समजून घेणारा हात शोधताना अखेर खा. सोनवणेंचा हात पुढे आला. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिका आणि तपासातील दिरंगाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले असून, खा. सोनवणे यांच्या भेटीनंतर प्रकरणाला नव्याने वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयातून बाहेर पडताना खा. सोनवणे यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सासूचीही भेट घेतली. यावेळी त्यांच्या अश्रूचा बांध फुटला आणि त्या म्हणाल्या माझ्या लेकराला मारलं... पोलिस काही करत नाहीत... न्याय द्या. त्यांचा हंबरडा पाहून उपस्थितांचे डोळे देखील पाणावले. सोनवणे यांच्याही भावना दाटून आल्याने अश्रू पुसताना दिसले.