

Beed Saurabh Kulkarni Case
केज : मेडिकल शिक्षणातील प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांशी व पालकांशी ओळख वाढवून लाखो-कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप सौरभ कुलकर्णी याच्यावर करण्यात आला आहे. बीएएमएसच्या प्रवेशासाठी गेलेल्या एका विद्यार्थ्याला एमबीबीएसला प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून १० लाख १० हजार रुपयांची रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तक्रारीनुसार, सौरभ कुलकर्णी हा वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन देत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील विद्यार्थ्यांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. अशाच एका प्रकरणात १३ जानेवारी २०२६ रोजी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील डॉ. तोंडे यांची फसवणूक करून ८ लाख रुपये उकळल्याप्रकरणी केज उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाने सौरभ कुलकर्णी याला कराड येथून अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सय्यद जावेद कराडकर, अमिरोद्दीन इनामदार व अनिल मंदे यांनी केली.
तक्रारीनुसार, सौरभ कुलकर्णी व त्याचा साथीदार डॉ. सतीश कांबळे (पुणे) यांनी संगनमत करून जालना जिल्ह्यातील वसंतनगर तांडा (ता. बदनापूर) येथील कन्हैयालाल बाबुराव चव्हाण यांची फसवणूक केली. त्यांच्या मुलगा अतुल चव्हाण याला एमबीबीएसला इन्स्टिट्यूट कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकूण १० लाख १० हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे.
सुरुवातीला धुळे येथील मेडिकल कॉलेजला प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. मात्र धुळ्याला जाऊन चौकशी केल्यानंतर प्रवेश यादीत नाव नसल्याचे समोर आले. त्यानंतर रत्नागिरी येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे सांगत टाळाटाळ करण्यात आली. पैसे परत मागूनही रक्कम न दिल्याने चव्हाण यांनी तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून ५ डिसेंबर २०२३ रोजी जालना येथील चंदनजीरा पोलीस ठाण्यात सौरभ कुलकर्णी (नागपूर) व डॉ. सतीश कांबळे (पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ४५९/२०२३ भादंवि कलम ४२०, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शिंदे करीत आहेत.
अतुल चव्हाण याला २०२२ मध्ये झालेल्या नीट परीक्षेत ३९० गुण मिळाले होते. तो बीएएमएसच्या पात्रता यादीत असल्याने प्रवेश प्रक्रियेसाठी वडिलांसोबत बँकेत गेला असता, एका महिलेने तिच्या मुलीला डॉ. सतीश कांबळे यांनी एमबीबीएसला प्रवेश मिळवून दिल्याची माहिती दिली. त्यानंतर संपर्क साधल्यावर, सौरभ कुलकर्णी याच्या ‘ओळखी’ असून तो प्रवेशासंबंधी कन्सल्टिंग करतो, असे सांगण्यात आले. यासाठी १२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले.
५ डिसेंबर २०२२ – सौरभ व सुरेश यांच्या खात्यात प्रत्येकी ३ लाख रुपये (एकूण ६ लाख)
१४ डिसेंबर २०२२ – ५० हजार रुपये
१५ डिसेंबर २०२२ – २ लाख ५० हजार २० रुपये
१७ डिसेंबर २०२२ – १ लाख १० हजार रुपये
एकूण रक्कम : १० लाख १० हजार रुपये