

मुंबई : मुलीला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून एका महिलेची साडेचौदा लाखांची फसवणूक करुन पळून गेलेल्या दोन आरोपींना पुण्यासह उत्तरप्रदेशातून आझाद मैदान पोलिसांनी अटक केली. कृष्णमोहन विष्णूदत्त शर्मा ऊर्फ निरज आणि एनुल झेनुल हसन ऊर्फ रेहान अशी या दोघांची नावे आहेत.
या दोघांकडून फसवणुक झालेली साडेचौदा लाखांची कॅश जप्त करण्यात आल्याचे एपीआय लिलाधर पाटील यांनी सांगितले. यातील तक्रारदार महिला धोबीतलाव परिसरात राहते. तीन वर्षांपूर्वी तिची मुलगी नाशिक येथे मेडीकलचे शिक्षण घेत होती. नीट परिक्षेसाठी ती ऑनलाईन तयारी करत होती.
याच दरम्यान तिची मोहम्मद वसीमशी ओळख झाली होती. त्याने तोदेखील मेडीकल कॉलेजचा विद्यार्थी असून त्याला रेहान आणि निरज यांनी मेडीकलमध्ये प्रवेश मिळवून दिला होता. ते दोघेही तिला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देतील, असे सांगून तिची त्यांच्याशी ओळख करुन दिली होती. या दोघांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तिला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगितले होते. त्यानंतर तिने त्यांची माहिती तिच्या तक्रारदार आईला दिली होती. तिनेही त्यांच्यावर विश्वास ठेवून मुलीच्या मेडीकल कॉलेजमधील प्रवेशासाठी 14 लाख 40 हजार रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिच्या मुलीला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदार महिलेने आझाद मैदान पोलिसांत तक्रार केली होती.