

Beed Flood Situation
पिंपळनेर: बीड तालुक्यातील पिंपळनेर महसूल मंडळात झालेल्या मुसळधार पावसामुळे सिंदफना नदीला पूर आला आहे. नदीपात्रावरून पाण्याचा विसर्ग वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी घुसले आणि मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले.
पिंपळनेर परिसरातील सर्वात मोठा लिंबारूई देवी येथील मनकर्णिका प्रकल्प 100% भरल्यामुळे प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे डाव्या कालव्यामधून पाटाचे पाणी थेट शेतात शिरून पिंपळादेवी व पाडेगाव येथील शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तुर, ऊस यांसारखी हंगामी पिके पाण्यात बुडाली. मेहनतीने उभे केलेले पीक नष्ट झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत. विशेष म्हणजे, एवढे नुकसान होऊनही महसूल मंडळातील अधिकारी, तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांनी अद्याप पाहणी केली नाही, याबाबत शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, पाडेगाव परिसरात पाणी वाढल्याने गावाचा संपर्क तुटण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर असलेल्या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात पाणी वाढले की गावकऱ्यांना वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध राहत नाही. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.
शेतकरी किरण पटाईत, भागवत येडे, सुर्यकांत घुबडे, प्रल्हाद घुबडे, गंगाधर घुमरे, गौरव घुमरे, कांता लेंडाळ, कडू लेंडाळ यांची पिके पाण्यात बुडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. याबाबत शेतकरी संघटनेचे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप घुमरे यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, महसूल मंडळ अधिकारी, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांनी तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत व तहसीलदारांकडे अहवाल पाठवावा.