Majalgaon Protest | ‘आश्वासन नको, काम सुरू करा’; माजलगावात नागरिकांचा रास्ता रोको

डॉ. आंबेडकर चौक-झेंडा चौक रस्त्यासाठी सिंदफणा नदीपुलावर दोन तास आंदोलन; मुख्याधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
Majalgaon Sindphana River Bridge Rasta Roko
Majalgaon Sindphana River Bridge Rasta RokoPudhari
Published on
Updated on

Majalgaon Sindphana River Bridge Rasta Roko

माजलगाव : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते झेंडा चौक-आंबेडकरनगर या मार्गावरील मंजूर रस्ता व नाली बांधकामाचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी संतप्त नागरिकांनी सिंदफणा नदीपुलावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. ‘आश्वासन नको, काम सुरू करा’ अशी ठाम भूमिका घेत आंदोलकांनी नगर परिषद प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. माजी नगरसेवक रोहन राजाभाऊ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते झेंडा चौक-आंबेडकरनगर या मार्गावरील रस्ता आणि नाली बांधकामाला मंजुरी मिळाली असून कार्यारंभ आदेशही देण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Majalgaon Sindphana River Bridge Rasta Roko
Majalgaon Crime | कृष्णा राठोड मृत्यू प्रकरण; १५ दिवसांत आरोपींना अटक न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

यापूर्वी १३ जुलै रोजी नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊन काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून पंधरा दिवसांत काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. प्रशासनाच्या आश्वासनानंतर २२ जुलै रोजी प्रस्तावित रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र, पंधरा दिवसांची मुदत उलटूनही काम सुरू झाले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या आश्वासनावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

त्यानंतर २५ ऑगस्ट रोजी रोहन घाडगे यांनी पुन्हा माजलगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना निवेदन देऊन तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली. मात्र, त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने अखेर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

Majalgaon Sindphana River Bridge Rasta Roko
Majalgaon Corporator Protest | सत्ताधारी नगरसेविकेचेच उपोषण; माजलगाव पालिकेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर

श्रावण, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्ता धोकादायक

सध्या श्रावणमास सुरू असून झेंडा चौक परिसरातील पुरातन सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची मोठी वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे भाविक तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून परिसरातील मोठ्या गणेश मंडळांच्या मिरवणुका आणि विविध कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होणे आवश्यक असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

‘मंजूर आणि कार्यारंभ आदेश झालेले काम प्रत्यक्षात सुरू का होत नाही? प्रशासनाने दिलेले आश्वासन केवळ कागदावरच राहणार का?’ असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

रास्ता रोकोमुळे सिंदफणा नदीपुलावरील वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनधारक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

Majalgaon Sindphana River Bridge Rasta Roko
Majalgaon Farmers Protest : कर्जमाफीच्या जाचक अटी रद्द करा; शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचा ताफा अडवला

या आंदोलनात अभय होके पाटील, दत्तात्रय रांजवण, गोविंद टाकणखार, विजय धायगुडे, दत्ता महाजन, अभिजीत कोंबडे, इलियास इब्राहिम पटेल, माजी नगरसेवक नारायण होके पाटील, सागर खुरपे, मोहसीन बागवान, दादा होके यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

दरम्यान, नगर परिषदेचे मुख्याधिकारी बालवडकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. चार दिवसांत मागणीनुसार रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news