

Majalgaon Municipal Council
माजलगाव : माजलगाव नगरपरिषदेतील सत्ताधारी गटातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे. प्रभाग क्रमांक १३ मधील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत बहुजन विकास मोर्चाच्या नगरसेविका उषा अशोक लांडगे यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत प्रभागातील समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नगरसेविका लांडगे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक १३ मधील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची स्वच्छता, कचरा उचलण्यातील दिरंगाई, मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव तसेच अन्य मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सत्ताधारी गटाची नगरपरिषदेत सत्ता असतानाही त्याच गटातील नगरसेविकेला आपल्या प्रभागातील मूलभूत प्रश्नांसाठी उपोषणाचे हत्यार उपसावे लागत असल्याने पालिकेच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या उपोषणाची पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपद एकाच कुटुंबात गेल्याने इतर नगरसेवकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. त्यातच नगरसेविका उषा लांडगे यांनी उपनगराध्यक्ष सहल चाऊस यांच्या कारभारावर मनमानीपणाचा आरोप केला आहे. सत्ताधारी गटातील या उघड नाराजीमुळे माजलगाव नगरपरिषदेतील अंतर्गत राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
प्रभागातील नागरी प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याबरोबरच पालिकेतील अंतर्गत मतभेदांवरही प्रशासन व सत्ताधारी गट कशा पद्धतीने तोडगा काढतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.