

Majalgaon minor girl assault case
माजलगाव : चॉकलेट देतो म्हणून एका वयोवृद्ध नराधमाने नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना दि.२८ जानेवारीरोजी माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलीस हद्दीतील एका वाडीत घडली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस तत्काळ जेरबंद करत बीड जिल्हा कारागृहात त्याची रवानगी केली.
पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार,धारूर तालुक्यातील एका वाडीत एक शेतमजूर कुटुंब राहते, त्यांची इयत्ता चौथीत शिकणारी नऊ वर्षीय मुलगी दि. 28 जानेवारीरोजी सकाळी शाळेत जात असताना मैत्रिणीला भेटण्यासाठी गेली. यावेळी रस्त्यातच आरोपी बाबुराव केरबा निरडे याने तिला चॉकलेट देतो म्हणून घरात बोलावून घेतले. दरवाजाची कडी लावून तिच्या अंगावरील सर्व कपडे काढून अत्याचार केला.
त्यानंतर मुलगी शाळेत गेली, घरी आल्यापासून ती शांत शांत राहत असल्याने दि.२९ रोजी आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने घडलेली सर्व आपबिती सांगितली. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत अंबाजोगाई येथून फरार आरोपीस जेरबंद केले. आरोपी बाबुराव निरडेची बीड जिल्हा कारागृहात रवानगी केल्याची माहिती सपोनि महादेव ढाकणे यांनी दिली आहे.