

Majalgaon Bullock Cart Rally
माजलगाव : पीकविमा भरपाईच्या मागणीसाठी जागर प्रतिष्ठानचे विशाल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाचव्या दिवशी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पीकविमा प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी माजलगाव शहरातून बैलगाडी मोर्चा काढला. मोठ्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी शेतकऱ्यांनी पीकविमा भरपाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली. मोर्चानंतर उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांनी आंदोलकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याशी चर्चा करण्यासाठी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक आयोजित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी आज सायंकाळी साडेसहा वाजता शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आंदोलकांना देण्यात आली.
गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात पीकविमा भरपाईचा प्रश्न निकाली काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या चर्चेत ठोस निर्णय न झाल्यास कृषिमंत्री दत्ता भरणे आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याचा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाचव्या दिवशी बैलगाडी मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवत प्रशासनाचे लक्ष पीकविमा प्रश्नाकडे वेधले. आता जिल्हाधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.