बीड, पुढारी वृत्तसेवा: वीज चोरीचे प्रकरण दडपण्यासाठी लाच घेणाऱ्या महावितरणच्या महिला अधिकाऱ्यासह अन्य एकाला रंगेहात पैसे घेताना ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज (दि. ६) केली. पूनम लहू आमटे असे अटक केलेल्या महिला विद्युत सहाय्यकाचे नाव आहे. (Beed Bribe Case)
याबाबत अधिक माहिती अशी की, पूनम लहू आमटे (विद्युत सहाय्यक) या धानोरा रोडच्या उपकेंद्रात कार्यरत आहेत. एका ग्राहकांच्या घरात महावितरणने वीज चोरी समोर आणल्यानंतर त्या ग्राहकाला वीज चोरीचे प्रकरण समोर न आणण्यासाठी २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. त्यात तडजोडीअंती १६ हजार रुपये घेण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचून लाच घेताना खासगी व्यक्तीला रंगेहाल पकडले. (Beed Bribe Case)
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पूनम आमटे व खासगी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरत गारदे, अमोल खरसाडे, सुरेश सांगळे, हनुमान गोरे, संतोष राठोड, अविनाश गवळी, स्नेहलकुमार कोरडे, अंबादास पुरी, गणेश मेहेत्रे यांनी केली.