

केज : समाजाला कायद्याचे धडे देणारे आणि शहाणपण शिकवणारे स्वतःच्याच घरात कसे वागतात, याचा एक प्रकार केज शहरात उघडकीस आला आहे. नवरा आणि सासरा दोघेही पेशाने वकील, तर सासू जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका... अशा उच्चशिक्षित कुटुंबाने अवघ्या दहा महिन्यांत सुनेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सुनेने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू, सासरे आणि नणंदेवर केज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे (मुळशी) येथील माणगाव येथे राहणाऱ्या बाजीराव भराटे (मूळ रा. पारा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांची मुलगी वैष्णवी यांचा विवाह ५ डिसेंबर २०२५ रोजी केज येथील योगीराज थोरात यांचा मुलगा सोमेश थोरात याच्याशी झाला होता. वैष्णवीचे सासरे योगीराज थोरात आणि नवरा सोमेश थोरात हे वकिली करतात तर सासु नंदा थोरात या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहेत. लग्न ठरवताना सासरच्यांनी ७ तोळे सोने आणि १ लाखाची मागणी केली होती; मात्र तडजोड करून ५१ हजार रुपये हुंडा व कपड्यांचा खर्च देऊन विवाह पार पडला. मात्र, लग्नानंतर अवघ्या आठवड्यातच (१४ डिसेंबर २०२५) सासरे ॲड. योगीराज थोरात यांनी वैष्णवीच्या मामाला फोन करून 'उरलेले ७ तोळे सोने कधी देता?' अशी विचारणा सुरू केली.
१५ डिसेंबर रोजी पती ॲड. सोमेश याने "सासरच्या घरी येताना सोने, लॅपटॉप आणि सर्व कागदपत्रे घेऊन ये, अन्यथा येऊ नकोस,' अशी धमकी दिली. २३ डिसेंबर रोजी घरात सत्यनारायणाची पूजा असताना पतीने वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ व मारहाण केली. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी वैष्णवी माहेरी गेली असता, 'परत येताना लॅपटॉप, टॅब आणि गाडी घेऊन ये, किंवा गाडीसाठी पैसे आण,' अशी अट पतीने घातली. याबाबत सासऱ्यांकडे तक्रार केली असता त्यांनीही "नांदायला येऊ नकोस" असे सुनावले.
मध्यस्थीनंतर वैष्णवी सासरी केज येथे नांदण्यासाठी आली असता, सासरच्या मंडळी घराला कुलूप लावून कोठेतरी निघून गेली होती. त्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने पिंपरी चिंचवड येथे कौटुंबिक हिंसाचार संदर्भात महिला समुपदेशन केंद्रात तक्रार दाखल केला, मात्र तरीही सासरची मंडळी तेथे आली नाहीत. त्यांनंतर अखेर पीडित विवाहितेने हिंजवडी (पुणे) पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबावरून पती ॲड. सोमेश थोरात, सासरा ॲड. योगीराज थोरात, सासू नंदा थोरात (शिक्षिका) आणि नणंद अशा चौघांविरुद्ध केज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस जमादार संगीता हनवते पुढील तपास करत आहेत.