

Private Travel Bus Fire Kej
केज : केजजवळ सोमवारी (दि.१६) पहाटे खासगी लक्झरी बस पलटी होऊन भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसला आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी असलेल्या तिघांना प्रथमोपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास जळगावहून लातूरकडे जाणारी एका खासगी ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस केज–मांजरसुंबा मार्गावरील सांगवी-सारणी वळणाजवळ आली असता चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. अपघातानंतर प्रवासी बाहेर पडत असतानाच बसने अचानक पेट घेतला. सुदैवाने सर्व प्रवासी वेळेत बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र बस आगीत पूर्णपणे जळून बेचिराख झाली.
या अपघातातील जखमी प्रवाशांमध्ये ऋषिकेश शिवाजी पाटणकर (२८, रा. नांदूरगाव), प्रशांत शिवाजी गायकवाड (२५, रा. नांदूरगाव), विशाल शिवाजी गायकवाड (२७, रा. नांदूरगाव), उमेर शारेख शेख (३४, रा. अंबाजोगाई), मयूर युवराज साळुंखे (३८, रा. नांदूर), प्रथमेश राजकुमार काळे (३०, रा. लातूर), सय्यद अब्दुल रहमान (२०, रा. लातूर), सय्यद रहमान (५४, रा. लातूर), मधुकर भगवान शिरसागर (६४, रा. लातूर), सय्यद वाहेद (५०, रा. लातूर), मुकेश कोंडीराम उपेशे (२५, रा. लातूर), राजकुमार दिनेश पठाण (१९, रा. जबलपूर), चंद्रकांत ब्रिजलाल राऊत (४८, रा. रावेर, जळगाव), संस्कार चंद्रकांत राऊत (१७, रा. रावेर, जळगाव), सुनील गुलाब धनगर (१९, रा. शिटकळ), आदिनाथ गोविंद पकटे (२४, रा. लातूर), गणेश बालाजी शिंदे (२४, रा. निलंगा), मनीष त्रिंबक नागदे (४८, रा. भुसावळ), रोहित गणेश प्रसाद (३०, रा. जबलपूर) आणि ऋषिकेश बिबीशन पाटणकर (३४, रा. नांदूर) यांचा समावेश आहे.
या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.