Beed crime | "जमीन माझ्या नावावर कर...", वडिलांनी नकार देताच मुलगा अन् सुनेचा संताप; वडिलांवर प्राणघातक हल्ला

|मध्यस्थी करायला गेलेल्या लेक-जावयालाही जीवे मारण्याची धमकी
Beed crime News
Beed crime News
Published on
Updated on

गौतम बचुटे

केज: ज्या वडिलांनी लहानाचे मोठे केले, त्याच वडिलांनी शेती आणि ट्रॅक्टर नावावर करण्यास नकार दिला. म्हणून एका 'दिवट्या' मुलाने पत्नी आणि सासरच्या मंडळींच्या मदतीने स्वतःच्या पित्यावरच प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील नाव्होली येथे घडली . या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अंबाजोगाई येथे उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय?

नाव्होली येथील रहिवासी सुभाष ठोंबरे यांचा मुलगा लक्ष्मण ठोंबरे हा गेल्या अनेक दिवसांपासून वडिलांच्या नावावर असलेली शेतजमीन आणि ट्रॅक्टर स्वतःच्या नावावर करण्यासाठी तगादा लावत होता. या कारणावरून घरात सतत वाद होत होते. १४ मार्च रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास हा वाद विकोपाला गेला. गावातील चौकात लक्ष्मण ठोंबरे आणि त्याची पत्नी सारिका यांनी सुभाष ठोंबरे यांना गाठले. "जमीन आणि ट्रॅक्टर माझ्या नावावर का करत नाहीस?" असा जाब विचारत त्यांनी काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

सासरच्या मंडळींचीही साथ

धक्कादायक बाब म्हणजे, सून सारिका हिचे माहेर त्याच गावात असल्याने तिचे आई-वडील, भाऊ आणि चुलते यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आपल्या जावयाला साथ देत या सर्वांनी मिळून सुभाष ठोंबरे यांना अमानुषपणे मारहाण केली. भांडणाचा आवाज ऐकून सुभाष ठोंबरे यांची मुलगी मीना बिक्कड आणि जावई दादा बिक्कड हे बचावासाठी धावून आले. मात्र, संतप्त झालेल्या हल्लेखोरांनी त्यांनाही सोडले नाही. त्यांनाही मारहाण करत "मध्ये आलात तर जीवे मारू" अशी धमकी दिली.

वृद्ध पित्याची प्रकृती गंभीर

या भीषण मारहाणीत सुभाष ठोंबरे हे रक्तबंबाळ झाले असून त्यांच्या तोंडावर, हातावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. मारहाणीमुळे त्यांचे शरीर काळेनिळे पडले आहे. त्यांना तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मालमत्तेसाठी रक्ताच्या नात्यानेच रक्ताचा सडा सांडल्याने केज तालुक्यात या घटनेची तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news