

Anushka Patole Death
केज : लातूर येथील नवोदय विद्यालयात आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मातंग समाजातील अल्पवयीन मुलगी अनुष्का पाटोळे हिच्या संशयित मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी केज येथे विविध दलित संघटना यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
या बाबतची माहिती अशी की, लातूर येथील नवोदय विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असलेली अनुष्का पाटोळे हिला व्यस्थापन करीत असलेल्या प्राचार्य, कर्मचारी, यांनी पट्यानी बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्य झाला. त्या नंतर त्यांनी तिने गळफास घेतल्याचा बनाव केला. या घटनेच्या निषेधार्थ केज येथे आज (दि. १२) दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या रस्ता रोको आंदोलनास रोहित कसबे, बाबुराव गालफाडे, सुनील हिरवे, लखन हजारे, प्रियका लांडगे, शितल लांडगे, दत्ता लांडगे, अशोक गायकवाड, कपिल मस्के, योगेश गायकवाड, इरफान पठाण, अनिल लोखंडे, शरद थोरात, साहिल तांबोळी, दिलीप गालफाडे, अमन पठाण आणि सर्व बहुजन समाजातील युवक, महिला, नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे केज मधून जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या.
यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अनुष्का पाटोळे प्रकरणाची एसआयटी स्थापन करून चौकशी करावी. नवोदय विद्यालयातील सिसिटव्ही फुटेज जप्त करून निष्पक्षपणे सखोल करण्यात यावी. नवोदय विद्यालयचे प्राचार्य व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस.निरीक्षक यांना सहआरोपी करून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा.