

Kaij Married Woman End Life
केज : ‘तुला तीन मुलीच झाल्या, आमच्या वंशाला दिवा नाही,’ असे म्हणून सासरी सतत शारीरिक व मानसिक छळ सहन करावा लागत असल्याने २५ वर्षीय विवाहितेने फॅनला साडीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना केज तालुक्यातील उंदरी येथे घडली. या प्रकरणी पती, सासू व सासऱ्यांविरोधात युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यातील आजरखेडा (ता. रेणापूर) येथील प्रकाश सूर्यवंशी यांची मुलगी अरुणा हिचा विवाह १६ ऑगस्ट २०१९ रोजी केज तालुक्यातील उंदरी येथील उद्धव ठोंबरे याच्याशी झाला होता. विवाहाच्या वेळी उद्धव ठोंबरे बँकेत नोकरीस होते, मात्र नंतर त्यांनी नोकरी सोडून शेती व्यवसाय सुरू केला. दरम्यान, या दाम्पत्याला राजनंदिनी (वय ५ ) तसेच आर्या व अपूर्वा (वय ४ ) अशा दोन जुळ्या मुलींसह एकूण तीन मुली झाल्या.
तीन मुली झाल्याच्या कारणावरून अरुणा हिचा पती उद्धव ठोंबरे दारूच्या नशेत तिला शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा आरोप आहे. तसेच सासू इंदूबाई ठोंबरे व सासरे उत्तम ठोंबरे हेही ‘आम्हाला मुलगा हवा होता, तू आमचा वंश बुडविलास,’ असे म्हणून तिला घालून-पाडून बोलत मानसिक छळ करीत होते.
या छळाबाबत अरुणा ठोंबरे हिने वेळोवेळी आपल्या आई-वडील, भाऊ गोविंद सूर्यवंशी तसेच मोठी बहीण करुणा हिला फोनवरून व माहेरी आल्यानंतर माहिती दिली होती. सासरच्या त्रासामुळे तिला सासरी नांदण्याची इच्छा नसल्याचे ती वारंवार व्यक्त करीत होती. मात्र माहेरच्या मंडळींनी तिची समजूत काढून तिला धीर देण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर सततच्या छळाला कंटाळून अरुणा ठोंबरे हिने १० जानेवारीरोजी दुपारी सुमारे २ वाजता उंदरी येथील राहत्या घरी घरातील फॅनला साडीने गळफास घेऊन जीवन संपविले. या प्रकरणी अरुणा ठोंबरे हिचा भाऊ गोविंद सूर्यवंशी यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात उद्धव ठोंबरे, त्याची आई इंदुबाई ठोंबरे आणि उत्तम वडील ठोंबरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत बरडे हे तपास करीत आहेत.
अरुणा ठोंबरे हिच्या मृत्यूनंतर कु. राजनंदिनी वय (५ ), कु. आर्या व कु. अपूर्वा वय (४ वर्षे) या तिन्ही चिमुकल्या उघड्यावर पडल्या आहेत.