

Kapil Maske hunger strike
केज : केज येथील गायरान जमिनीच्या अदलाबदलीतील कथित गैरव्यवहार, पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता आणि भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या चौकशीसह दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी माजी नगरसेवक कपिल मस्के आजपासून (दि. १२) केज तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
केज शहरातील सर्वे नं. ३०/१ ही जमीन शर्तभंगाची कारवाई झालेली असताना देखील खरेदी-विक्री झाल्यामुळे, ती व्यवहार तात्काळ रद्द करावी. जनविकास इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कथितपणे खोटे दस्तऐवज तयार करून खरेदी-विक्री केली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. सर्वे नं. ३०/२ ही गायरान जमीन असून, अटी-शर्तींचा भंग झाल्याने संबंधितांवर कारवाई करावी. येवता (ता. केज) येथील सर्वे नं. ७८ व केज शहरातील सर्वे नं. ३०/२ या जमिनींच्या अदलाबदलीत झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करावी. पंतप्रधान आवास योजना आणि नगर पंचायतीशी संबंधित इतर मागण्यांवरील अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागण्यांसाठी मस्के यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.