Beed Fraud | मालक बारामतीत; केजमध्ये बनावट व्यक्ती उभी करून प्लॉट केला स्वतःच्या नावावर

मूळ मालकाला अंधारात ठेवून बनावट कागदपत्रांच्या आधारे प्लॉट हडपण्याचा प्रयत्न; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
Kaij  Fraudulent Property Registration
केज दुय्यम निबंधक कार्यालय Pudhari
Published on
Updated on

Kaij Fraudulent Property Registration

केज : बारामती येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्तीच्या मालकीचा केज येथील प्लॉट त्याच्या परस्पर बनावट व्यक्ती उभी करून आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, संबंधित व्यक्ती केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित नसतानाही त्याच्या नावाने दस्तनोंदणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच, कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दस्तनोंदणी केल्याचा दावाही करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर केज पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रांशी संबंधित विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील सोरडे वस्ती येथील प्रवीण दादा निकम यांच्या नावे केज येथील गट क्रमांक २२८/२/४ मध्ये ३.६० आर क्षेत्रफळाचा खुला प्लॉट आहे. निकम यांनी हा प्लॉट १७ जानेवारी २०२३ रोजी कायदेशीररीत्या खरेदी केला होता. या मालमत्तेबाबत कोणताही वाद नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

Kaij  Fraudulent Property Registration
Beed Crime | कडा येथे तरुणीशी गैरवर्तन; डॉ. महेंद्र पटवा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक अहिल्यानगर येथील रुग्णालयात

मात्र, १४ मे २०२५ रोजी केज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रमांक १६८१/२०२५ अन्वये या प्लॉटचे खरेदीखत करण्यात आले. प्रवीण निकम हे त्या दिवशी केजच्या दुय्यम निबंधक कार्यालयात उपस्थित नसतानाही त्यांच्या नावाने हा व्यवहार करण्यात आल्याचा आरोप आहे. रोहन रवींद्र कोमटवार याने अधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि बनावट साक्षीदारांच्या मदतीने स्वतःच्या नावावर बोगस खरेदीखत करून घेतल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

जुन्या दस्तावरील फोटोचा वापर?

या खरेदीखतावर प्रितम प्रकाश नांदेडकर आणि शांतीनाथ प्रकाश काळे हे साक्षीदार असल्याचे नमूद आहे. दस्तनोंदणीच्या वेळी टोपी घातलेल्या एका अज्ञात व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर उभे करण्यात आले आणि त्याच्यावर जुन्या दस्तावरील प्रवीण निकम यांचा फोटो वापरण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या खरेदीखतासोबत हद्द कायम, पोटहिस्सा जमीन मोजणीचा नकाशाही जोडण्यात आला आहे. मात्र, प्रवीण निकम यांनी असा नकाशा मिळवण्यासाठी उपअधीक्षक, भूमी अभिलेख, केज यांच्याकडे कोणताही अर्ज केला नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे संबंधित मोजणी नकाशाही बनावट असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Kaij  Fraudulent Property Registration
Beed Crime: सासरच्या जाचाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने जीवन संपवले

तक्रारीची दखल न घेतल्याने न्यायालयात धाव

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर प्रवीण निकम यांनी संबंधित यंत्रणांकडे तक्रार केली. मात्र, तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी केज न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्या तक्रारीवरून केज पोलिस ठाण्यात रोहन रवींद्र कोमटवार (रा. केज), प्रितम प्रकाश नांदेडकर (रा. अयोध्यानगर, धारूर) आणि शांतीनाथ प्रकाश काळे (रा. संभाजी चौक, धारूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केज पोलिस ठाण्यात गु.र.नं. ५६४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम २३५, २३६, २३७, ३१८(२), ३१८(४), ३१९, ३३६(२), ३३६(३), ३३६(४), ३४०, ३(५) तसेच नोंदणी अधिनियमातील कलम ८२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब रोडे तपास करीत आहेत.

कार्यालयीन वेळेनंतर दस्तनोंदणीचा आरोप

संबंधित दस्तनोंदणी कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सायंकाळी उशिरा करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. बनावट मालक आणि साक्षीदार उभे करून दस्तनोंदणीची प्रक्रिया पार पडल्याचा दावा करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Kaij  Fraudulent Property Registration
Beed Crime: विलास घुले प्रकरणात मोठी अपडेट; उमेश मानेला अखेर अटक

तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार?

खरेदी-विक्री व्यवहाराच्या वेळी संबंधित व्यक्तींच्या आधारकार्डसह ओळखपत्रांची पडताळणी आणि व्हेरिफिकेशन करणे आवश्यक असते. या प्रकरणात आवश्यक पडताळणी करण्यात आली नसल्यास तत्कालीन दुय्यम निबंधक आणि संबंधित कर्मचाऱ्यांचीही भूमिका तपासली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

विविध विभागांकडे निवेदन; अखेर न्यायालयात दाद

फसवणूक झाल्याचा आरोप असलेले प्रवीण निकम यांनी पोलिस प्रशासन, भूमी अभिलेख विभाग, नोंदणी प्रशासन तसेच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदने देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने अखेर त्यांनी केज न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आता या कथित बनावट दस्तनोंदणीमागील संपूर्ण साखळीचा तपास होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news