

केज : दुभत्या गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीवरून सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पती, सासू, सासरे, दीर आणि नणंदेविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील तळणी (ता. अंबाजोगाई) येथील गोविंद केंद्रे यांची मुलगी ऋतुजा हिचा विवाह बनकरंजा (ता. केज) येथील अंकुश जनार्धन नागरगोजे याच्याशी २३ ऑगस्ट २०२० रोजी झाला होता. विवाहानंतर सुरुवातीचे एक वर्ष ऋतुजा सासरी सुखाने नांदत होती. त्यानंतर तिला मुलगा आयुष झाला. मात्र, त्यानंतर दुभत्या गाई-म्हशी खरेदी करण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्याची मागणी तिच्याकडे करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
ही रक्कम आणण्यासाठी ऋतुजाला सासरच्या मंडळींकडून वारंवार मारहाण केली जात होती. तसेच शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला उपाशी ठेवले जात असल्याचा आरोप आहे. सण-समारंभासाठी माहेरी आल्यानंतर ऋतुजाने आई-वडिलांना सासरी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती.
काही महिन्यांपूर्वी पती अंकुश, सासू, सासरे आणि दीर यांनी पैसे का आणत नाहीस, असे म्हणत ऋतुजाला मारहाण केली. त्यानंतर तिचा पती तिला तळणी येथील माहेरी आणून सोडून गेला. यावेळी ऋतुजाने आई-वडील आणि चुलत चुलत्यांना सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. पती, सासू-सासरे, दीर आणि नणंद पैसे आणण्यावरून सतत अपमानास्पद बोलून मारहाण करत असल्याचे तिने सांगितले होते.
यानंतर ऋतुजा सुमारे दोन महिने माहेरी राहिली. आई-वडिलांनी तिची समजूत काढून पुन्हा तिला बनकरंजा येथे सासरी नेऊन सोडले. पैसे उपलब्ध झाल्यानंतर देऊ, असे त्यांनी सासरच्या मंडळींना सांगितले होते. मात्र, नागपंचमीच्या सणाला माहेरी आल्यानंतरही ऋतुजाने सासरचे लोक पैशांची मागणी करीत असून, पैसे न दिल्यामुळे आपल्याला त्रास देत असल्याचे सांगितले होते. २० ऑगस्ट रोजी आई-वडिलांनी ऋतुजाला सोन्याची अंगठी देऊन पुन्हा सासरी बनकरंजा येथे सोडले होते.
दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ऋतुजाने विषारी द्रव्य प्राशन केले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला धारूर येथील डॉ. हजारी यांच्या खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी तिला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मयत ऋतुजाचे वडील गोविंद केंद्रे यांच्या तक्रारीवरून पती अंकुश जनार्धन नागरगोजे, सासरे जनार्धन जग्गनाथ नागरगोजे, सासू नंदुबाई जनार्धन नागरगोजे, दीर गजेंद्र जनार्धन नागरगोजे आणि नणंद मनिषा दत्ता मुंडे (रा. सोनहिवरा, ह.मु. अंबाजोगाई) यांच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, ११५(२), ८०, ८५ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भीमराव मांजरे तपास करीत आहेत.
ऋतुजाचे लग्न जुळविताना सोनहिवरा (ता. परळी) येथील दत्तात्रय मुंडे यांनी अंकुश नागरगोजे हा सांगोला (जि. सोलापूर) येथे नोकरी करीत असल्याचे सांगितले होते. मात्र, लग्नानंतर वर्षभरातच अंकुश गावी परतला आणि शेतीचे काम करू लागला, असा आरोप ऋतुजाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
ऋतुजाच्या मृत्यूमुळे तिची दोन लहान मुले आयुष आणि अमृता आईला मुकली आहेत. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने आरोपींवर पोलिसांकडून पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.