

Sexual Assault Case Kej Taluka
केज : केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३५ वर्षीय विधवा महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ५७ वर्षीय व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २४) सावळेश्वर (पैठण) येथील मधुकर उर्फ मदन विश्वनाथ म्हस्के (वय ५७) याने पीडित महिलेला शेतातील भाजीपाला घेऊन जाण्याच्या बहाण्याने शेतात बोलावले. सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास ती महिला शेतात गेली असता, एकटेपणाचा गैरफायदा घेत आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेची कुणाला माहिती दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेनंतर पीडितेने युसुफवडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ३२६/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमजद सय्यद व पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे यांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे करत आहेत.