

Kej Bhatumba Murder Case
केज : केज तालुक्यातील भाटुंबा येथील तरुण दगडू उर्फ आण्णा ज्ञानेश्वर धपाटे (वय २७) यांच्या खून प्रकरणातील मागील दहा महिन्यांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आशिष बळीराम आंबाड (रा. अंबाजोगाई) याला पोलिसांनी केज तालुक्यातील पळसखेडा शिवारातून अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास युसूफ वडगाव पोलीस ठाण्याअंतर्गत सुरू असून सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या पथकाने ही कारवाई केली. ४ मार्च रोजी आरोपीबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. पुढील तपास एपीआय मच्छिंद्रनाथ शेंडगे करीत आहेत.
भाटुंबा येथील दगडू उर्फ आण्णा धपाटे हे ऊसतोडणीच्या हंगामात ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होते. चार महिन्यांपूर्वी सावळेश्वर येथील सावळेश्वर मस्के यांच्या पत्नीवरून धपाटे आणि मस्के यांच्यात वाद झाला होता. दोन्ही गावांतील माजी सरपंचांच्या मध्यस्थीने तो वाद मिटविण्यात आला होता. मात्र त्यानंतर मस्के यांनी धपाटे यांना धमकी दिल्याचे सांगितले जाते.
२६ मे २०२५ रोजी दुपारी सुमारे ४ वाजता दगडू धपाटे आणि त्यांचा मित्र सचिन करपे (रा. जवळबन, ता. केज) हे दुचाकीवरून जात असताना रोहन मस्के, सोन्या मस्के (दोघे रा. सावळेश्वर) तसेच लाडेगाव येथील चार ते पाच जणांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर दोघांना रोहन मस्के यांच्या मामाच्या शेतात नेण्यात आले.
तेथे धपाटे आणि करपे यांना झाडाला बांधून काठी व चामडी बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी अवस्थेत दोघांना कळंब–अंबाजोगाई रस्त्यावरील पावनधामजवळ टाकून देण्यात आले. मारहाण करणाऱ्यांनी धपाटे यांच्या मोबाईलवरून त्यांचे भाऊ सिद्धेश्वर धपाटे यांना घटनेची माहिती दिली.यानंतर कुटुंबीय व ग्रामस्थांनी दगडू धपाटे व सचिन करपे यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दगडू उर्फ आण्णा धपाटे यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी सिद्धेश्वर धपाटे यांच्या तक्रारीवरून रोहन मस्के, सोन्या मस्के व इतर पाच जणांविरुद्ध येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी वैभव मस्के, रोहित मस्के, सुहास पाटोळे, रोहन धीरे, राजेश जंगले आणि अन्सार पठाण या सहा संशयितांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, या प्रकरणातील आशिष आंबाड हा मागील दहा महिन्यांपासून फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केल्याने या खून प्रकरणाच्या तपासाला वेग आला आहे.