

Kej Atrocity Act case
केज : ऊसतोड मुकादमाच्या मध्यस्थीवरून झालेल्या वादातून केज शहरातील एका विधवा महिलेला मारहाण करून तिच्यावर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका महिला व तिच्या अल्पवयीन मुलीविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना दि. ५ मार्च रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास केज येथील समर्थ नगर भागात घडली. समर्थ नगर येथे राहणाऱ्या संगीता रमेश वैरागे यांच्या घरी लता उमेश शिंदे व तिची सुमारे १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी गेल्या. त्यावेळी दोघींनी संगीता वैरागे यांना जातीवाचक शिवीगाळ करत केसाला धरून खाली पाडून मारहाण केल्याचा आरोप आहे.
माहितीनुसार, ऊसतोड मजूर मुकादम अशोक सावंत यांनी लता उमेश शिंदे यांना ऊसतोडणीसाठी दीड लाख रुपये दिले असल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला. या वादात हस्तक्षेप करू नकोस, असे सांगत लता शिंदे यांनी संगीता वैरागे यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच या संदर्भात यापूर्वीही पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे सांगितले जाते.
संगीता रमेश वैरागे यांच्या तक्रारीवरून लता उमेश शिंदे व तिच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीविरुद्ध केज पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकटराम हे करीत आहेत.