

Kaij Tehsil Office Self Immolation Attempt
केज : जमिनीचे सीमांकन करण्याबाबत निश्चित वेळ देऊनही संबंधित प्रशासकीय अधिकारी उपस्थित न राहिल्याने संतप्त कुटुंबीयांनी केज तहसील कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आंदोलकांनी तहसील कार्यालयात घुसून प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केज येथील सर्व्हे क्रमांक ३०/१ व ३०/२ मधील जमिनीचे सीमांकन करून ती जमीन ताब्यात देण्यात यावी, या मागणीसाठी विष्णू लांडगे, महादेव लांडगे, शंकर लांडगे, बळी लांडगे, शांताबाई लांडगे, संध्या लांडगे व सोजर लांडगे अशा सात जणांनी दि. १२ जानेवारी रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजता तहसील कार्यालयासमोर अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे, पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, पोलीस हेडकॉन्स्टेबल त्रिंबक सोपने, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी कागदे तसेच महिला पोलीस दगडखैर यांनी तात्काळ हस्तक्षेप करत आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक प्रचंड संतप्त व आक्रमक झाल्याने त्यांनी थेट तहसील कार्यालयात प्रवेश केला. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती.
केज येथील विष्णू श्रीमंत लांडगे व त्यांच्या पाच भावांना सर्व्हे क्रमांक ३०/१ व ३०/२ मधील प्रत्येकी ३२.४४ आर जमीन मा. दिवाणी न्यायालय (क स्तर), केज येथील दिवाणी दावा क्रमांक ७५/२०२४ मधील अंतिम हुकूमनाम्यानुसार वाटप झाली आहे. या न्यायालयीन आदेशानुसार मिळालेल्या जमिनीची नोंद महसूल अभिलेखात घेण्यात आली असून, वाटप तक्ता तयार करण्यासाठी जमिनीची मोजणी करण्याचे आदेश तहसील कार्यालयाने दि. १३ मार्च २०२५ रोजी भूमि अभिलेख कार्यालय, केज यांना दिले होते.
या जमिनीच्या मोजणीसाठी दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र मोजणीच्या वेळी अतिक्रमणधारकांनी विरोध करत मोजणीस मज्जाव केला होता. त्यामुळे अतिक्रमण काढून टाकून जमिनीची रीतसर मोजणी करून अहवालानुसार चतु:सीमा निश्चित करून देण्याची मागणी लांडगे कुटुंबीयांकडून करण्यात येत होती.
या मागणीसाठी दि. ८ ते १२ डिसेंबर दरम्यान लांडगे कुटुंबातील महिला व लहान मुलांनी केज तहसील कार्यालयासमोर चार दिवस उपोषण केले होते.
उपोषणादरम्यान तहसीलदारांनी दि. १२ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत जमिनीचे सीमांकन करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र दिलेल्या वेळेत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रतीक्षा करून अखेर दुपारी ४ वाजता लांडगे कुटुंबीयांनी आत्मदहनाचा टोकाचा पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले.
या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. पुढील कारवाईबाबत चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.